पेटीएमचा मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन

हिंदुस्थानात सध्या मोबाईलची विक्री प्रचंड वाढली असून आता देशभरात ९५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येकडे मोबाईल्स आलेले आहेत. साहजिकच मोबाईलच्या बाजारपेठेत विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. ऑनलाइन शॉपिंगलादेखील पसंती दिली जात आहे. याचा फायदा उठवण्यासाठी चढाओढ आहे. पेटीएमचाच एक भाग असलेल्या पेटीएम मॉलने आता आपल्या पोर्टलवरून मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ‘मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन’ उपलब्ध करून दिला आहे. मोबाईलच्या किमतीच्या पाच टक्के दरात हा प्लॅन उपलब्ध असेल. या प्रोटेक्शन प्लॅनद्वारे ग्राहकाच्या मोबाईलला स्क्रीन अथवा इतर ऍसेसरीजला झालेल्या नुकसानीपासून अपघात किंवा चोरीपासून पूर्ण वर्षभर संरक्षण देण्यात येणार आहे. या काळात मोबाईलला दुरुस्तीची गरज भासल्यास तो ग्राहकाच्या घरातूनच थेट कलेक्ट केला जाईल किंवा ग्राहक जवळच्या दुकानातून तो रिपेअर करून घेऊ शकणार आहे.

मायक्रोसॉफ्ट तेजीत
मायक्रोसॉफ्टचे ‘ऑफिस ३६५’ आणि पूर्णपणे देशी बनावटीचे ‘कैजाला’ हे दोन अॅप्स सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हिंदुस्थानातील बँकिंग, वैद्यकीय सेवा, शिक्षण संस्था अशा अनेक शाखांमधील प्रमुख संस्था या दोन अॅप्सच्या मदतीने स्वतःला डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न आहेत. स्टेट बँकेबरोबर मायक्रोसॉफ्टने हात मिळवला असून एसबीआयच्या क्लाऊड स्टोरेज सिस्टीमला तसेच स्थळाला अधिक सुरक्षित आणि अत्याधुनिक बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट मदत करणार आहे. ‘ऑफिस ३६५’ ला एसबीआयने वापरासाठी निवडले आहे. एसबीआयच्या २३,४२३ शाखा, २,६३,००० कर्मचारी आणि ५० कोटी ग्राहकांसाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टच्याच ‘कैजाला’ या अॅपला येस बँक, युनायटेड फॉस्फरस लि., अपोलो टेलिमेडिसिन आणि केंद्रीय विद्यालय यांनी कामकाजासाठी स्वीकारले आहे.