वेब न्यूज – चोरीचा फोन परत मिळवून द्यायला आता सरकार करणार मदत

>> स्पायडरमॅन

सध्याच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या जोडीला मोबाईल फोनची गरजदेखील समाविष्ट करायला हवी असे जगभरातच गमतीने म्हणले जाते. विनोदाचा भाग सोडला तर हे बऱयाच प्रमाणात खरेदेखील आहे. कोरोनाच्या साथीनंतर तर हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात मोबाईल फोनचा वापर प्रचंड वाढलेला आहे. मोबाईल, घडय़ाळ, पैशाचे पाकीट, आरोग्य तपासणी अशा अनेक सोयी देणारा मोबाईल, तुमची बॅंकेची वा इतर सरकारी कार्यालयांतील कामेदेखील घरी बसून करण्याची सोय तुम्हाला प्राप्त करून देतो. आजवर तरुण अथवा वृद्धांचा सोबती ठरलेला मोबाईल कोरोना साथीनंतर लहानग्यांचादेखील सवंगडी बनला आहे. सध्या अनेक मुलांचे शिक्षण या मोबाईलच्या मदतीने ऑनलाइन चालू आहे, थांबलेले नाही. असा हा सध्या ‘जीवनावश्यक’ बनलेला मोबाईल हरवला तर किंवा चोरीला गेला तर? अनेकांना तर ही कल्पनासुद्धा करणे अवघड जाते. या गमावलेल्या फोनमध्ये अनेकदा आपला महत्त्वपूर्ण डाटा असतो. ही सगळी माहिती एखाद्या अनोळखीच्या व्यक्तीच्या हातात पडणार या कल्पनेनेच अनेकांना कापरे भरते. मात्र आता अशी घाबरण्याची गरज नाही. तुमचा मोबाईल गहाळ झाल्यास अथवा चोरीला गेल्यास तो मिळवून देण्यासाठी पोलिसांच्या मदतीनेच सरकारदेखील तुमची मदत करणार आहे. आता आपण आपला हरवलेला मोबाईल सरकारी वेबसाईटच्या मदतीने ‘लॉक’ करू शकता आणि तो परत मिळाल्यावर पुन्हा ‘अनलॉक’ करू शकता. सर्वात आधी आपल्याला https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर जायचे आहे. तिथे ब्लॉक स्टोलन / लॉस्ट मोबाईलचा पर्याय निवडून दिलेल्या फॉर्ममध्ये मोबाईलसंदर्भात विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. यात आयएमईआय नंबर, फोनचे मॉडेल अशी माहिती द्यावी लागेल. एकदा का नीट माहिती भरली गेली की, सरकार सर्व नेटवर्कवर तुमच्या मोबाईलला ‘ब्लॉक’ करेल. एकदा मोबाईल परत मिळाला की, मग तुम्ही याच वेबसाईटच्या मदतीने त्याला ‘अनब्लॉक’ करू शकाल.

आपली प्रतिक्रिया द्या