वेब न्यूज – बुलेट ट्रेन थेट चंद्रावर

>> स्पायडरमॅन

पृथ्वीबाहेरदेखील सत्ता गाजवण्यासाठी जगातील प्रमुख देश प्रयत्न करीत असतात. अमेरिका आता पुन्हा चंद्रावर स्वारी करण्याच्या तयारीत आहे, चीन एकट्याच्या बळावर मंगळावर पाणी शोधत आहे; तर रशियाच्या मदतीने चंद्राची संयुक्त मोहीमदेखील आखत आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात बाप मानला जाणारा जपान तरी मागे कसा राहील? जपानने चक्क पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बुलेट ट्रेन नेण्याची योजना आखली आहे. त्याच जोडीला चंद्रावर मानवी वस्तीसाठी सुयोग्य असा कृत्रिम अधिवासदेखील उभारण्याची तयारी करत आहे. इतर ग्रहांवर गुरुत्वाकर्षण हे कमी प्रमाणात असल्याचे दिसते. कमी गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी मानवाचे स्नायू आणि हाडे कमकुवत होतात. अशा वेळी पृथ्वीवर जसे वातावरण आणि गुरुत्वाकर्षण आहे, अगदी तशीच परिस्थिती असलेला एक ‘आर्टिफिशियल स्पेस हॅबिटेट’ अर्थात कृत्रिम अधिवास उभारण्याची तयारी जपानने चालवली आहे. या अधिवासामध्ये मानवाला स्पेस सूट घालून वावरण्याची गरज भासणार नाही, कारण तिथले वातावरण अगदी पृथ्वीच्या वातावरणासारखेच असेल. एखाद्या कॉलनीप्रमाणे या अधिवासाची रचना असेल आणि चंद्र व मंगळ या ग्रहांवर तो उभारला जाईल. जपान जर बुलेट ट्रेन चंद्रापर्यंत नेण्यास यशस्वी झाले, तर ती ट्रेन पुढे मंगळापर्यंत नेण्याचीदेखील योजना बनवली जात आहे.

जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटी आणि काजिमा कन्स्ट्रक्शन यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाची योजना तयार केली आहे. या काचेच्या कृत्रिम अधिवासाची रचना एखाद्या शंकूसारखी असेल, जी परग्रहांवर मानवी वस्तीची निकड पूर्ण करेल. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसारख्या मानवांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसह ग्रीन एरिया, जलस्रोत, नद्या, उद्याने, पाणी आदी सर्व व्यवस्था मिळणार आहेत. चंद्रावर तयार होणाऱया या काचेच्या वसाहतीला ‘लुनाग्लास’ असे नाव दिले जाईल, तर मंगळावर तयार होणारी वसाहत ‘मार्सग्लास’ म्हणून ओळखली जाईल. त्याचा प्रोटोटाइप 2050 पर्यंत तयार होईल.