वेबसीरीजमधून देवी-देवतांचा आणि सैनिकांचा अपमान, एकता कपूर म्हणतेय माफी मागायला तयार!

2122

वेबसीरीजमधून देवी देवता आणि सैनिकांचा अवमान केल्याप्रकरणी निर्माती एकता कपूर हिने माफी मागायची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्याचवेळी तिने सोशल मीडियावर होणाऱ्या आक्षेपार्ह ट्रोलिंगचा विरोधही केला आहे.

अल्ट बालाजीवरील एका वेबसिरीजमुळे निर्माती एकता कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. XXX नावाच्या वेबसिरीजमध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा, सैनिकांचा आणि देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे, असे तक्रारदाराने म्हटले होते. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदुस्थानी भाऊने देखील एकता कपूरच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. एकता कपूरने आल्ट बालाजीच्या एका वेबसीरीजमध्ये हिंदुस्थानी जवानांचा अपमान केला आहे, असं हिंदुस्थानी भाऊने तक्रार दाखल केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं. खार पोलीस स्थानकात त्याने ही तक्रार नोंदवली होती.

निर्माती एकता कपूर यांची अल्ट बालाजी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर अडल्ट कंटेटचा भरणा आहे. त्यात XXX season 2 मध्ये एका एपिसोडमध्ये एक महिला जवानाची पत्नी दाखवली आहे. ही पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करते. सेक्स करताना तिने हिंदुस्थानी सैन्याचा पोषाख घातला आहे, यामुळे हिंदुस्थानी सैन्याचा अपमान झाला, म्हणून निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी माफी मागावी अशी मागणी हिंदुस्थानी भाऊने केली होती.

या प्रकरणी सोशल मीडियावर प्रचंड गदारोळही झाला होता. त्यावर खुलासा करताना निर्माती एकता कपूर म्हणाली की, मी हिंदुस्थानी सैन्याचा आदर करते. आपल्या देशाच्या संरक्षण प्रक्रियेत सैन्य सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावतं. जर, सैन्याच्या कोणत्याही विभागातर्फे माझ्याकडून माफीची मागणी आली तर मी त्यासाठी तयार आहे, असं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

मात्र, दुसरीकडे महिलांविरोधात सोशल मीडियावर होणाऱ्या गलिच्छ ट्रोलिंगविरोधातही तिने मत मांडलं आहे. ती म्हणाली की, मला सोशल मीडियावर अतिशय आक्षेपार्ह कमेंट मिळत आहेत. आज मी जिथे आहे, तिथे उद्या दुसरी कुणीतरी असेल. मला आणि माझ्या आईला बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, जे सर्वथा चूक आहे. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही, असंही ती यावेळी म्हणाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या