लग्नाची वरात, तोट्याच्या घरात! समारंभाच्या व्यवसायांना तब्बल १ लाख कोटींचा फटका बसणार

577

सर्वच क्षेत्रांचे कंबरडे मोडणाऱ्या कोरोना महामारीने लग्नसराईपुढेही मोठे आव्हान उभे केले आहे. विषाणू संसर्गाच्या भितीने सरकारने लग्नमंडपात केवळ 50 वऱ्हाडींना मुभा दिली आहे. ही मर्यादा तत्काळ शिथील न केल्यास लग्न समारंभांशी संबंधित व्यवसायांना तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या तोट्याची झळ बसणार आहे. परिणामी, लाखो व्यावसायिकांसह कोट्यवधी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. सरकारने लग्नात 300 ते 400 वऱ्हाडींना हजर राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

लॉकडाऊनमुळे मार्च ते जुलैदरम्यान लग्न समारंभ होऊ न शकल्यामुळे आधीच ‘वेडींग इंडस्ट्री’ला 15 ते 20 हजार कोटींचा फटका बसला आहे. 25 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सरकारने वऱ्हाडींच्या संख्येवरील मर्यादा शिथील न केल्यास व्यवसायातील तोटा 1 लाख कोटींच्या घरात जाईल. एका वर्षात देशात साधारण 1 कोटीहून अधिक लग्न समारंभ होतात. या समारंभांतील वऱ्हाडींच्या संख्येवरील मर्यादा शिथील करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. यासह अन्य मागण्यांबाबत केंद्र सरकारला साकडे घातले आहे, असे ऑल इंडिया टेंट डेकोरेटर वेल्फेअर असोसिएशनचे सीनिअर व्हॉइस चेअरमन रवी जिंदल यांनी सांगितले.

– देशात लग्न समारंभांच्या निमित्ताने वर्षाला जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. कोरोना महामारीमुळे ही उलाढाल संकटात सापडली आहे.

या व्यवसायांची दमछाक
इव्हेंट, फूल, लाईट, जनरेटर, डीजे साउंड, बॅण्ड, फोटोग्राफर, ऑर्केस्ट्रा, कॅटरिंग, हलवाई, हॉल हे व्यवसाय लग्न समारंभाशी संबंधित आहेत. तसेच कपडे, ज्वेलरी, फूटवेअर, किराणा आदी व्यवसायांनाही लग्नसराईत सुगीचे दिवस असतात. या व्यवसायांची कोरोनामुळे दमछाक झाली आहे.

जवळपास 12 ते 13 कोटी लोकांचा रोजगार टांगणीला
वेडींग इंडस्ट्रीत टेंट, मॅरेज गार्डन, कॅटरिंग, डेकोरेशन आणि इव्हेंट आदीशी संबंधित जवळपास तीन कोटी व्यावसायिक आहेत. या इंडस्ट्रीत वर्षाला 12 ते 13 कोटी लोकांना रोजगार मिळतो. म्हणजेच देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 10 टक्के लोकसंख्या या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. महामारीतील निर्बंधांमुळे या लोकांचा रोजगार टांगणीला लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या