जुळून आल्या रेशीमगाठी

110

वर्षा फडके

एखादा राँग नंबर आपल्या आयुष्यात एकढा महत्त्वाचा ठरू शकतो, असा ललिता बन्सीनं कधी विचारही केला नसेल… २०१२ साली ऑसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या ललितानं आपल्या ’राईट मॅन’ म्हणजेच रविशंकर सिंग सोबत साताजन्माच्या गाठी मारल्या. रिल लाइफप्रमाणे वाटणारी ही रिअल लाईफमधील कहाणी. पाच वर्षांपूर्वी आयुष्यात आलेल्या वादळानंतर सावरलेल्या ललिताला प्रेमाची खरी व्याख्या रविशंकरच्या रूपात गवसली आहे. या अनोख्या प्रेमाची कहाणी सांगणारी ही ललिता बन्सीची मुलाखत.

  • ललिता तुझ्या लग्नाबद्दल सगळ्यांनाच खूप कौतुक आणि आनंद होतोय काय सांगशील…
    – मला स्वतःला झालेला आनंद तर मी शब्दात सांगू शकणार नाही. पण ज्या दिवसापासून माझे लग्न झाले आहे, त्या दिवसापासून मला आणि माझ्या पतीला अनेक फोन येत आहेत. सगळे फोन करणारे आमचे अभिनंदन करीत आहेत आणि माझ्या पतीचे कौतुक करीत आहे. मला सांगायला नक्कीच आवडेल की, आजही एखाद्या महिला किंवा मुलीबाबत दुर्दैवी घटना घडल्यानंतर समाज तिला स्वीकारायला तयार नसतो अशा वेळी माझ्या पतीने दाखविलेले धैर्य आणि मोठेपणा याचे कौतुक वाटते. आज माझ्या पतीमुळे मला माझी जिंदगी दोबारा मिळाली असून हे आयुष्य मी मनसोक्त माझ्या पतीबरोबर सुखाने घालविणार आहे.
  • तुझ्या आयुष्यातल्या दुःखद घटनेविषयी तुझ्या पतीला पूर्ण जाणीव आहे, याविषयी काय सांगशील?
    – ठाण्यातील कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारी ललिता बन्सी सांगते की, साधारणपणे ५ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. २०१२ च्या सुमारास माझ्यावर माझ्या नातेवाईकाकडूनच ऑसिड हल्ला झाला होता, त्यानंतर तर मला कधी माझे लग्न होईल असे वाटलेच नाही. मी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये गेले होते तेव्हा माझ्या मामाच्या मुलाबरोबर माझा किरकोळ वाद झाला होता. त्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. माझ्या मामेभावाने माझ्यावर राग काढण्यासाठी माझ्या चेहऱ्यावर ऑसिड टाकून माझा चेहरा विद्रुप केला होता. त्यावेळी माझ्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. आतापर्यंत माझ्या चेहऱ्यावर आतापर्यंत १७ शस्त्रक्रिया झाल्या, तर अजून १२ शस्त्रक्रिया बाकी आहेत. ऑसिड हल्ल्यानंतर माझा आत्मविश्वास गेला होता. आता आपण नॉर्मल आयुष्य जगू शकू असे वाटत नव्हते. मात्र आता आयुष्यात रविशंकरसारखा जोडीदार मिळाल्यामुळे माझ्या आयुष्याचे सुखद पर्व सुरू झाले आहे. एका चुकीच्या फोन कॉलमुळे आमचे आयुष्य सुखद वळणावर येऊन पोहोचेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी तर असे म्हणीन की, माझ्या पतींनी राँग नंबर डायल केला, पण तो लागला ‘राईटनंबर’ला. देव माणसात असतो असं म्हणतात. आज राहुलच्या रूपाने मला माझा देव भेटला आहे.
  • रविशंकर यांची एंट्री तुझ्या आयुष्यात कशी झाली ?
    – त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी माझे पती रविशंकर यांचा मला फोन आला. मी ठाण्यात राहते तर माझे पती मालाड येथे. एक राँग नंबर आला त्यादिवशी पण आमचे नाते कायमचे झाले. लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या पतीला सगळे सांगावे असे मला वाटत होते. त्यामुळेच मग मी माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार रविशंकर समोर मांडला. परंतु रविशंकर यांनी मला त्यावेळी ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या रूपाशी नाही’ असे म्हणत त्यांनी मला स्वीकारले. रविशंकर यांच्याविषयी सांगायचे तर ते एका खासगी कंपनीत काम करतात. रविशंकरमुळे माझ्या आयुष्यात आलेली बहार यामुळे आयुष्य एका नव्या वळणावर आले आहे. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी एक चुकीचा फोन आला पण त्याच चुकीच्या फोनने मला पुन्हा पंधरा दिवसांनी फोन करुन मला भेटण्यास उत्सुक आहे असे सांगितले आणि मग आमचे लग्न बाय चान्स न होता बाय चॉईस झाले.

ललिताला तिचे हक्काचे घर मिळाले याचा आनंद
लग्न ही तर प्रत्येकाच्याच आयुष्यातली जीवनाला वळण देणारी घटना. ललिताचं आयुष्यही फार काही वेगळं नव्हतं. पण एका ऑसिड हल्ल्यानं होत्याचं नव्हतं झाले. ऑसिड हल्ल्यातील पीडित तरुणीसाठी आयुष्य म्हणजेच शाप होऊन जातं. अशा तरुणींसाठी लग्न तर लांबचीच गोष्ट. पण उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील येऊन आता ठाण्यात राहणाऱ्या ललिता बन्सी या तरुणीच्या आयुष्यात लग्नाचा मंगल क्षण आला. ललिता बन्सीवर अॅसिडहल्ला झाला आणि तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. आता ललिता पुन्हा आयुष्यात उभारी घेऊ शकणार नाही असे वाटत असतानाच राहुल तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. मला आनंद वाटला की केवळ एका राँग फोन कॉलच्या माध्यमातून ललिताचे लग्न झाले. मुंबईतील मालाडमध्ये राहणारा रवी आणि ठाण्याच्या कळवा येथे राहणारी ललिता यांच्या लग्नामुळे आयुष्य हे सुंदर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मला आनंद आहे की, आता लग्नानंतर ललिताच्या चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च प्रसिद्ध सिने अभिनेता विवेक ओबेरॉय, आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक उद्योजक करणार आहे. ललिता बन्सी आणि राहुल सिंग यांच्या विवाहामुळे ऑसिडपीडित महिलेलाही नवीन आयुष्य मिळू शकते हे सिध्द झाले आहे. ललिता बन्सी आणि राहुल सिंग यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा…

-विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या