कोरोनाने बदलल्या नशेखोरांच्या सवयी, नाईट क्लब बंद असल्याने जगभरातील नशेबाजांत वाढली अफू, गांजाची मागणी

582

कोरोना महामारीमुळे नाईट क्लब आणि नाईट पार्ट्या बंद झाल्याने सतत नशा आणणारी ड्रग्ज घेणाऱया जगभरातील नागरिकांनी आता आपली तलफ भागवण्यासाठी झाडे आणि वेलींपासून मिळणाऱया गांजा आणि भांग यासारख्या नैसर्गिक पदार्थांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अमेरिकेपासून ते थेट ऑस्ट्रेलियापर्यंत मोठय़ा संख्येने युवा वर्ग नशेसाठी हे पदार्थ वापरत असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या पार्ट्या बंद झाल्याने रासायनिक ड्रग्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक चरस आणि गांजा या पदार्थांनी आपली व्यसनी तलफ जगातील 5 पैकी 2 नशेबाज शमवत असल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बार आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत. त्यामुळे नेहमी दम मारो दमसाठी पार्टीत एक्सटेसी, कोकिन, हेरोइन या रासायनिक ड्रग्जचा सर्रास वापर व्हायचा. पण आता लॉकडाऊनमुळे हे नशेचे पदार्थ मिळणे कठीण झाले आहे. त्यावर पर्याय म्हणून नशेबाज आता गांजा आणि अफू या नैसर्गिक झिंग आणणाऱया पदार्थांकडे वळले आहेत. आपला एकाकीपणा घालवण्यासाठी काही लोक गांजा, भांग आणि अफूसारख्या पदार्थांनी आपली तलफ शमवून घेत आहेत. त्यामुळेच जगभरात गांजा आणि भांग या पदार्थांची मागणी प्रचंड वाढली आहे. 11 श्रीमंत देशांतील 55 हजार नागरिकांचा सर्व्हे केल्यावर हा प्रकार स्पष्ट झाला आहे.

ऑस्ट्रेलियात 49 टक्के वाढ

ऑस्ट्रेलियात भांग आणि गांजाच्या विक्रीत 49 टक्के वाढ झाली आहे. त्याउलट कोकिनचा खप 38 टक्क्यांनी, एक्सटेसीचा खप 41 टक्क्यांनी तर केटामाईनचा खप 34 टक्क्यांनी कमी झाला आहे. अमेरिकेत गांजा, भांगेच्या खपात 46 टक्के तर ब्रिटनमध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाल्याचे या नव्या सर्व्हेत स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या