आठवड्याचे भविष्य

मानसी इनामदार

समस्या- 3 वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. अजूनपर्यंत यश मिळाले नाही. काय करावे? – प्रियंका फुसे
तोडगा- रोज संध्याकाळी देवासमोर बसून रामरक्षा म्हणावी. मुलाखतीला जायच्या दिवशी आंघोळ झाल्यावर एका फुलास कुंकू लावून पूर्वेकडे तोंड करून सूर्यास अर्पण करावे.

मेष – मित्रांचा पाठिंबा
जुने मित्र भेटतील. त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला कामात मिळेल. त्यामुळे बऱयाच अवघड गोष्टी सुलभ होतील. आठवडा मजेत जाईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांशी वागताना नम्रपणाने वागा. भगवा रंग जवळ बाळगा. प्रवासात जास्त वेळ घालवणे टाळा. शुभ परिधान-पोवळ्याचे आभूषण, भगवे उपवस्त्र

वृषभ – नवी जबाबदारी
नव्या कामाची जबाबदारी घ्याल आणि यशस्वीपणे पारही पाडाल. हा आठवडा सगळ्याच बाबतीत यश देणारा आहे. हिरवा रंग जवळ बाळगा. प्रकृतीची हेळसांड नको. पिण्याच्या पाण्यात रोज दोन तुलसी पत्र टाका. असे नियमित करा.
शुभ परिधान-गुलाबाचे फूल, हिरवा कुर्ता

मिथुन – प्रसन्नता वाढेल
घरातील लहान मुलांकडून शुभ समाचार कानी पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. देवधर्माचे कार्य हातून पार पडेल. घरात भावंडांशी थोडेफार मतभेद होतील. पांढरा रंग महत्त्वाचा ठरेल. शिवोपासना करा. दररोज शिवकवच स्तोत्र वाचा.
शुभ परिधान-चमेलीचा वळेसर, पांढरा शर्ट

कर्क – सामाजिक प्रतिष्ठा
आपल्या मूळ गावी जाण्याचे योग आहेत. तेथे अनेक सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. पण त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष नको. कुटुंबासमवेत तीर्थयात्रेवर जाण्याचे योग आहेत. त्यामुळे चित्तवृत्ती सात्त्विक होतील. मोतिया रंग नेहमीप्रमाणे शुभ ठरेल. शुभ परिधान-मोगऱयाचे अत्तर, दोनमुखी रुद्राक्ष

सिंह – मेहनतीचे फळ
सुवार्ता कानी पडेल. आधी घेतलेल्या मेहनतीचे फळ आत्ता मिळेल. आठवडा धावपळीचा असेल. तब्येतीची काळजी घ्या. घरातील उद्योगधंद्याकडे लक्ष द्या. फसवणूक होण्याची शक्यता आहे. निळा रंग जवळ बाळगा. चंदन तिलक कपाळी लावा.
शुभ परिधान-चंदनाचा लेप, खादीचा कुर्ता

कन्या – सकारात्मक बदल
बऱयाच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. पण त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आपल्या कामाची जागा शक्य झाल्यास तात्पुरती बदला. सकारात्मक बदल जाणवतील. कोणालाही पैसे उधार देऊ नका. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान-चांदीच्या बांगडय़ा, रेशमी वस्त्र

तूळ – आनंद वाटेल
जवळच्या व्यक्तीच्या विवाहसोहळ्यात सामील व्हाल. त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागेल. उद्योगात थोडी प्रतिकूलता निर्माण होण्याचे संकेत आहेत. सावध पावले उचला. लक्ष्मीपूजन करा. तिला वाहिलेले शेवंतीचे फूल स्वतःजवळ ठेवा. लाल रंग महत्त्वाचा.शुभ परिधान-सोन्याचे आभूषण, भरजरी वस्त्र

वृश्चिक – मित्रमैत्रिणी भेटतील
वादविवादांपासून दूर राहा. विशेषतः दुसऱयांच्या वादात अजिबात पडू नका. वाहनसौख्य लाभेल. पण स्वतः वाहन चालविण्याचे टाळा. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. तांब्याच्या भांडय़ातून पाणी पिण्याचा नेम ठेवा. तांब्याचा रंग लाभदायी. शुभ परिधान- तांब्याचे वळे, जानवे

धनु – आत्मबल वाढेल
मित्रांकडून फसवणूक संभवते. अत्यंत सावध राहा. कोणतेही पैशाचे व्यवहार करू नका. गायीला गूळ खायला घाला. स्वतःच्या आहारातही गुळाचा समावेश करा. आत्मबल वाढेल. एखादी नवीन विद्या शिकण्याची संधी मिळेल. सोनेरी रंग जवळ ठेवा. शुभ परिधान-नवे घडय़ाळ, चामडय़ाची बॅग

मकर – प्रगतीचे मार्ग
घरखर्च वाढेल. पण काळजी करू नका. आवकही त्या प्रमाणात वाढेल. पण काटकसरीने राहण्याचा प्रयत्न करा. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन काम मिळेल. त्यातून अर्थलाभ होईल. प्रवास सफल होतील. प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ परिधान-फिरोजा खडा, निळी ओढणी

कुंभ – यश तुमचेच
एखादे थांबलेले काम प्रचंड वेगाने पूर्ण कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. यश तुमचेच आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आहारातील पथ्ये सांभाळा. मुलाच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. चुकीची सांगत लागण्याची शक्यता आहे. कोणताही चमकदार रंग जवळ बाळगा. शुभ परिधान-सुती वस्त्र, हिऱयाची अंगठी

मीन – नव्या कल्पना
खेळाडूंना गुडघेदुखी सतावेल. पथ्य सांभाळा. एखाद्या आनंद सोहळ्यात सामील व्हाल. मनास प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा माराल. काळा रंग परिधान करा. उत्तम संगीत कानी पडेल. नवीन कल्पना सुचतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. शुभ परिधान -काळा पोशाख, कोल्हापुरी चप्पल

आपली प्रतिक्रिया द्या