आठवड्याचे भविष्य-रविवार 5 ते शनिवार 11 मे 2019

>> नीलिमा प्रधान

मेष -राश्यांतर प्रेरणादायी
मेषेच्या पराक्रमात मंगळ, स्वराशीत शुक्र राश्यांतर तुमच्या प्रत्येक कार्याला प्रेरणादायी ठरेल. तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढत जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश सोपे नाही, पण तुमच्यासारखा ध्येयवादी आणि प्रयत्नवादी माणूसच मार्ग काढू शकतो. सर्वांचे सहकार्य मिळेल. शुभ दिनांक-6, 7

वृषभ-विचारपूर्वक निर्णय घ्या
वृषभेच्या धनेशात मंगळ, व्ययेशात शुक्र राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. जुन्या अनुभवांचा उपयोग करा. म्हणजे मोठी चूक होणार नाही. नोकरी, उद्योगात मोहाचे क्षण येतील. कायद्याचे पालन करा. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कोर्ट केस सोपी नाही. शुभ दिनांक-6, 7

मिथुन-सावध राहा

स्वराशीत मंगळ, मिथुनेच्या एकादशात शुक्र राश्यांतर तुमच्या कार्यात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोमवार-मंगळवार होईल. सावध राहा. म्हणजे राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य निर्णय घेऊ शकाल. व्यवसायात जम बसेल. कुटुंबात चांगला समाचार मिळेल. वेळेला महत्त्व द्या. शुभ दिनांक-10, 11

कर्क-मोठे काम मिळेल
कर्केच्या व्ययेशात मंगळ, दशमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. मैत्रीत, कुटुंबात आणि धंद्यात झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल, ती सोडू नका. मोठे काम मिळेल. माणसे प्रेमाने जोडली जातात आणि संतापाने संबंध दुरावतात याकडे लक्ष दिल्यास तुम्ही तुमच्या क्षेत्रात वेगाने प्रगती कराल. शुभ दिनांक -6, 7

सिंह- प्रतिमा उजळेल
सिंहेच्या एकादशात मंगळ, भाग्यात शुक्र प्रवेश करीत आहे. कुटुंबातील तणाव कमी होईल. व्यवसाय, नोकरी या ठिकाणी प्रतिमा उजळेल. मोठे कंत्राट मिळेल. न केलेल्या कामावर शुक्रवारी टीकास्त्र्ा सोडले जाईल. कोर्ट केसमध्ये दिशा मिळेल. नवीन परिचय वाढतील. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. शुभ दिनांक -5, 6

कन्या-संमिश्र घटना
कन्येच्या दशमेशात मंगळ, अष्टमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात सर्वच ठिकाणी संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. व्यवसाय आणि नोकरीत कामाचा व्याप वाढेल. व्यवहारात फसगत होऊ शकते. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्याची काळजी घ्या. मोहात अडकाल. शुभ दिनांक -6, 7

तूळ-ग्रहांची साथ आहे
तुळेच्या भाग्येशात मंगळ, सप्तमेशात शुक्र राश्यांतर होत आहे. तुम्ही ठरवलेल्या कार्याला योग्य दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक घटना घडेल. खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होईल. सर्वच गोष्टी उघड करू नका. कुटुंबात जबाबदारीने कामे करा. ग्रहांची साथ आहे, थांबू नका. शुभ दिनांक -8, 9

वृश्चिक-चहूबाजूंनी टीका होईल
वृश्चिकेच्या अष्टमात मंगळ, षष्ठशात शुक्र प्रवेश करीत आहे. यशाच्या भ्रमात राहू नका. नोकरी असो वा धंदा, मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ शकते. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचे पारडे जड राहील. अरेरावी नको. नम्र राहा. शुभ दिनांक- 6, 7

धनु -सासरकडून नाराजी
धनुच्या सप्तमेशात मंगळ आणि पंचमेशात शुक्राचे राश्यांतर होत आहे. सासरच्या लोकांकडून नाराजी होईल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. दुखापत संभवते. त्यामुळे कोणतेही काम चौफेर लक्ष देऊन करा. वेळेला महत्त्व दिल्यास अडचणी कमी करू शकाल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत प्रसिद्धी होईल. मोठे काम मिळेल. शुभ दिनांक- 5, 8

मकर -आत्मविश्वासाचे कौतुक
मकरेच्या षष्ठशात मंगळ आणि सुखेशात शुक्र राश्यांतर होत आहे. खंबीर आत्मविश्वासाचे कौतुक होईल. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दहशत वाढेल. तुमचा नेमका कल कुठे आहे याचे कोडे समोरच्या व्यक्तीला पडेल. नोकरीत बढती, बदल करता येईल. परदेशात जाता येईल. शुभ दिनांक- 5, 6

कुंभ-यशाची पताका फडकेल
कुंभेच्या पंचमेशात मंगळ, पराक्रमात शुक्र. तुमच्या यशाच्या पताका सर्वत्र फडकणार आहेत. व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी वेगाने घोडदौड होईल. चांगली संधी कापराच्या वडीसारखी असते हे लक्षात घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिश्रम सत्कारणी लागतील. अधिकारप्राप्ती होईल. प्रेमाला चालना मिळेल. शुभ दिनांक- 8, 9

मीन- सुखाच्या सरी येतील
मीनेच्या चतुर्थ स्थानात मंगळ, धनेश शुक्र राश्यांतर तुमच्या प्रत्येक कार्याला यशाची झालर लावणार आहे. व्यवसायात नवा फंडा उपयोगात येईल. नोकरीत बढती व बदल शक्य आहे. वास्तू व जमीन खरेदी-विक्री लाभदायक ठरेल. वाहनाचा वेग व रागाचा आवेग नियंत्रणात ठेवा. सुखाच्या सरी येतील. शुभ दिनांक- 5, 6