आठवड्याचे भविष्य – रविवार २२ जुलै ते शनिवार २८ जुलै २०१८

100

>>नीलिमा प्रधान

मेष – कष्टाशिवाय यश कठीण
शुक्र, गुरू लाभ योग आणि सूर्य, मंगळ प्रतियुती होत आहे. रविवार, सोमवार तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. व्यवसायात तडजोड करावी का, असा संभ्रम निर्माण होईल. सामाजिक कार्यात लोकांची आपुलकी मिळेल. कोर्ट केसमध्ये संयम ठेवा. कला, क्रीडा स्पर्धेत कष्टाशिवाय यश कठीण आहे.
शुभ दिनांक : २६, २७.

वृषभ – प्रसंगावधान ठेवा
चंद्र, मंगळ लाभ योग आणि चंद्र, बुध त्रिकोणी योग होत आहे. कठीण परिस्थितीत मार्ग शोधणे सोपे नसते. तरीही धंद्यात तग धरून राहता येईल. उधारी करू नका. राजकीय क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. गोड बोलून दिशाभूल करणाऱया व्यक्तीवर बुधवार, गुरुवार विश्वास ठेवू नका. नोकरीत टिकून राहता येईल.
शुभ दिनांक : २२, २३.

मिथुन – महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची वेळ
शुक्र नेपच्युन प्रतियुती आणि चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची हीच वेळ आहे. राजकीय क्षेत्रात विरोधक विरोध करतीलच, तुम्ही संयम ठेवा. व्यवसायात मोठा बदल होईल. गुंतवणूक वाढेल. कुटुंबात मनाप्रमाणे घटना घडल्या तरी धावपळ होईल. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक : २५, २६.

कर्क – आत्मविश्वास वाढेल
परीक्षेचा कालावधी असला तरी प्रतिष्ठा राखून तुम्हाला उत्तरे शोधता येतील. चंद्र, शुक्र केंद्रयोग आणि सूर्य, मंगळ प्रतियुती होत आहे. आत्मविश्वास वाढेल. धंद्याला टिकवून ठेवता येईल. मोठे कंत्राट मिळू शकेल. गुप्त शत्रूला कमी समजू नका. कायद्याला नाकारू नका.
शुभ दिनांक : २३, २७.

सिंह – निःस्वार्थी कार्यावर भर द्या!
शुक्र, नेपच्युन प्रतियुती आणि सूर्य, हर्षल केंद्रयोग होत आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्यावर मोठा दबाव राहील. टीका होईल. सामाजिक कार्यात विघ्न निर्माण केले जाईल. कोणतेही वक्तव्य करताना खऱयाखोटय़ाची शहानिशा करा. प्रसिद्धीपेक्षा निःस्वार्थी कार्यावर भर द्या.
शुभ दिनांक : २५, २६.

कन्या – दबदबा वाढेल
सूर्य, चंद्र त्रिकोण योग आणि चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. या आठवडय़ात जास्त महत्त्वाचे काम करून घेता येईल. व्यवसायात चांगला बदल करता येईल. राजकीय क्षेत्रात दबदबा वाढेल. कुटुंबात मुले, जीवनसाथी यांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक : २२, २३.

तूळ – वेळेला महत्त्व द्या!
चंद्र, बुध त्रिकोण योग आणि शुक्र, नेपच्युन प्रतियुती होत आहे. अडचणीत आलेली कामे होतील. वेळेला महत्त्व द्या. कामाचे योग्य नियोजन करा. राजकीय क्षेत्रात तडफदारपणे काम करा. प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरविणे तुमच्या हातात आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल.
शुभ दिनांक : २३, २४.

वृश्चिक – प्रयत्न वाढवावे लागतील
सूर्य, चंद्र त्रिकोण योग आणि चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. व्यवसायातील शिथिलता कमी होईल. तुमचे प्रयत्न तुम्हाला वाढवावे लागतील. सामाजिक कार्यात मनमानी करून तुमचा प्रभाव कमी होईल. राजकीय क्षेत्रातील गैरसमज दूर करा. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल.
शुभ दिनांक : २३, २४.

धनु – द्विधा अवस्था होईल
शुक्र, नेपच्युन प्रतियुती आणि सूर्य, शनी षडाष्टक योग होत आहे. मनात अनेक विचारांचा गुंता होईल. ठरवल्याप्रमाणे काम करणे कठीण होईल. व्यवसायात खर्च आणि समस्या यामुळे द्विधा अवस्था होईल. भागीदार नाराज होऊ शकतात. डोळय़ांची काळजी घ्या. कागदपत्रे सांभाळा.
शुभ दिनांक : २७, २८.

मकर – आर्थिक मदत मिळेल
सूर्य, चंद्र त्रिकोण योग आणि चंद्र, मंगळ युती होत आहे. व्यवसायात जम बसेल. समोरून गुंतवणूक करणारे येतील. नोकरीत स्थिरता वाटेल. सामाजिक कार्यात दर्जेदार लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक मदत मिळेल. बुधवार, गुरुवार कोर्टाच्या कामात संयम ठेवा.
शुभ दिनांक : २३, २७.

कुंभ – मार्ग शोधता येईल
शुक्र, नेपच्युन प्रतियुती आणि सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात बदल करण्याची घाई करू नका. समस्यांचा अभ्यास करून ठेवा. मार्ग शोधता येईल. गुप्त कारस्थाने करणाऱयांना ओळख व सरळ करा. अहंकारापेक्षा नम्रता ठेवा. वेळकाढू धोरण काही समस्यांसाठी उपयोगी ठरू शकते.
शुभ दिनांक : २३, २५.

मीन – गुरुपोर्णिमा विशेष
चंद्र, बुध त्रिकोण योग आणि सूर्य, मंगळ प्रतियुती होत आहे. आत्मविश्वास, बुद्धिचातुर्य यांच्या जोरावर कठीण प्रसंगावर मात करू शकाल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. थकबाकी वसूल करा. नवीन परिचयावर फार विश्वास ठेवू नका. व्यसनाने संधी जाईल. गुरुपौर्णिमा विशेष असेल.
शुभ दिनांक : २३, २७.

आपली प्रतिक्रिया द्या