भविष्य – रविवार १५ ते शनिवार २१ एप्रिल २०१८

29

>> मानसी इनामदार

मेष – अध्यात्मात रमाल
अध्यात्माकडे कल वाढेल. या आठवड्यात एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. दत्तगुरूंचे स्मरण करा, त्यांचे पूजन करा. व्यवसायातील अडचणी दूर होतील, यशाचे मार्ग दिसू लागतील, पण रागाला आवर घाला. अपरिचित व्यक्ती, किंबहुना कोणावरही पटकन चिडू नका. डोळ्यांची काळजी घ्या. तपकिरी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : थंड पदार्थ, गुलकंद, मोरावळा.

वृषभ – मनास शांतता
प्रसन्न, फलदायी आठवडा. तुमच्या दूरदर्शी स्वभावाचा प्रत्यय तुमच्या कामात तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱयांना येईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठांच्या जवळ जाल. अचानक धनप्राप्ती होईल. हातापायांच्या नखांची काळजी घ्या. बाहेरगावी जाण्याचा योग आहे. उघडय़ा पायांनी चालणे टाळा. विशेषतः मातीत जाऊ नका. हिरवा रंग जवळ बाळगा. मनास शांतता लाभेल.
शुभ आहार : पालेभाजी, शिराळ्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा.

मिथुन – जोडीदाराची साथ
आपल्या कामात दुसऱयांना हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नका. होत असलेल्या कामावर विनाकारण नकारात्मक परिणाम होईल. संपूर्ण आठवडा खूप आनंदात जाणार आहे. घरात छान वातावरण राहील. व्यवसायात फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करा. फायदा होईल. जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल. पिवळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : वरण, कडधान्यांची आमटी, पोळी.

कर्क – वेळेचा सदुपयोग
वेळ अजिबात वाया घालवू नका. मिळणाऱया प्रत्येक संधीचा सदुपयोग करून घ्या. सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. घरातील लहानांकडून चांगली बातमी कानावर येईल. त्यांची शैक्षणिक प्रगती मनास सुखावणारी असेल. पत्नीबरोबर जवळची एखादी सहल आखाल. समुद्रकिनारी अवश्य जा. मोतिया रंग फलदायी.
शुभ आहार : मत्स्याहार, खाऱया पाण्यातील मासे.

सिंह – बचत करा
मनोवांच्छित गोष्टी घडतील. कुटुंबीयांचे प्रेम आणि सद्भावना लाभतील आणि जाणवतील. त्यामुळे घरातल्या माणसांसाठी खूप काही करावेसे वाटेल, पण पैशांचा अपव्यय टाळा. बचतीचा उपयोग भविष्यकाळात मोठा ठरेल. आवडत्या गोष्टी खाण्यास मिळतील. जोडीदारास वेळ द्या. तुमच्या सहजीवनासाठी ते महत्त्वाचे आहे. घरातील देवीला शेवंतीची फुले वाहा. पिवळा रंग शुभकारक.
शुभ आहार : आवडीचे पदार्थ, गोड, तिखट.

कन्या – सकारात्मक निर्णय
स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा. या आठवडय़ात महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्याचा सकारात्मक निर्णय दिनचर्येवर होईल. आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. आठवडा धावपळीचा. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नको. व्यायामातील सातत्य महत्त्वाचे. गुंतवणुकीचा फायदा होईल. निळा रंग जवळ बाळगा. त्यामुळे घरात शांतता राहील. आकांक्षा पूर्ण होतील.
शुभ आहार : कैरीचे पन्हे, कैरीची डाळ, कैरी घालून पदार्थ.

तूळ – घरच्यांची साथ
मजेशीर आठवडा. भरपूर मनोरंजन होईल. त्यामुळे मनःस्थिती प्रसन्न राहील. या आठवडय़ात तो योग वारंवार येईल. त्यामुळे काम करताना नवा उत्साह संचारेल. घरातील व्यक्तीची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. संतुलित आहार घ्या, पोटाचे विकार संभवतात. हिरेखरेदीचा योग आहे. अक्षयतृतीया सत्कारणी लागेल. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : तूप, मेतकूट, भात, पेज.

वृश्चिक – मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी
उत्तम गुंतवणुकीचा लाभ तुम्हाला होणार आहे. त्यामुळे आर्थिक धनलाभ, मनाला आनंद देणाऱया घटना घडतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे उत्साहाचे आणि व्यस्त वातावरण राहील. आठवडा कसा गेला हे समजणार नाही, पण अपरिचित व्यक्तींना अकारण मदत करू नका. दान नेहमी सत्पात्री करावे. उन्हात फिरणे टाळा. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : दही, ताक, लोणी.

धनु – प्रेम बहरेल
कौटुंबिक अडचणी या आठवडय़ात दूर होतील. जोडीदाराशी एकवाक्यता होईल. त्यामुळे प्रेम नव्याने बहरेल. हा आठवडा प्रेमाचा आहे. जोडीने बाहेरगावी जाल. एकमेकांना वेळ द्याल. शिवपार्वतीची उपासना करा. घरात चांगले वातावरण राहील. व्यवसाय-उद्योगात लक्ष घाला. तिथे दुर्लक्ष नको. राखाडी रंग परिधान करा.
शुभ आहार : मनास जे आवडेल ते.

मकर – भरभराटीचा आठवडा
रखडलेले काम या आठवडय़ात मार्गी लागेल. त्यातून घसघशीत आर्थिक लाभ होईल. नवे काम हाती येण्यास सुरुवात होईल. विशेषतः लेखकांना भरभराटीचा आठवडा. तुमचा व्यवहारकुशल स्वभाव कामी येईल. हातून नवे लिखाण होईल. त्यातून पैसेही मिळतील. कल्पकतेची कसोटी लागेल. यशस्वी व्हाल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : गोड पदार्थ, दूध, साय.

कुंभ – संकटांवर मात
प्रेमाचा शोध संपेल. जोडीदारासोबत मधुर संबंध अनुभवाल, पण मन कशाचा तरी शोध घेत राहील. ते सापडेल. नव्या योजना आखाल. त्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करा. आपल्या मस्तीत राहाल, पण भविष्याकडे नजर राहू द्या. पैशांचा खूप अपव्यय होईल. सांभाळून खर्च करा. आकाशी रंग जवळ बाळगा. पायांची काळजी घ्या.
शुभ आहार : माफक तिखट पदार्थ, बेसन, डाळ.

मीन – स्वप्नपूर्तीच्या मार्गावर
स्थावर मालमत्ता अनपेक्षितपणे मिळेल. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. नव्या योजना हाती घ्याल. त्यांचा पाठपुरावा करा. स्वप्नपूर्तीच्या मार्गावर निघाल. यश मिळेल. मेहनतीत कसूर नको. खेळाडूंना आता चांगले दिवस. घरातील ज्येष्ठांचा उत्तम पाठिंबा लाभेल. त्यांची काळजी घ्या. घरातील लहान मुलांमध्ये रमाल. चमकदार हिऱयाचा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार : खिचडी, प्रथिने, अंडी.

आपली प्रतिक्रिया द्या