साप्ताहिक राशिभविष्य 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019

2883

>> मानसी इनामदार

मेष – सकारात्मक वाटेवर

वर्षभरातील आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा स्वतःच्या मनाशी घ्याल. नव्या आठवडयात तुमच्या कार्याला नव्याने वाव मिळेल. महत्त्वपूर्ण लोकांशी भेटीगाठी होतील. त्यातून कार्याला सकारात्मक दिशा मिळेल. तेजस्वितेचा लाल रंग परिधान करा.
शुभ परिधान – भरजरी पेहराव, काजळ

वृषभ – शुभ वार्ता

दिवाळीत महत्त्वपूर्ण गुंतवणूक कराल. त्यामुळे दूरगामी आर्थिक लाभ होईल. अचानक शुभ समाचार कानी येईल. पण कोणताही निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. कसलीही घाई करू नका. अपरीचितावर विश्वास ठेवू नका. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सोन्याची कर्णफुले, ब्रेसलेट

मिथुन – गृहलक्ष्मीचा वाटा

मित्र-मैत्रिणींसमवेत एखादी छोटी सहल आयोजित कराल. त्यामुळे कामातील ताणतणाव तितकेसे जाणवणार नाहीत. उद्योगधंद्यात अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. खर्चाचे पत्रक गृहलक्ष्मीच्या हाती सोपवा. अबोली रंग परिधान करा.
शुभ परिधान –  सोनेरी घडयाळ, नवे कपडे

कर्क – खरेदी कराल

अतिरिक्त खर्च टाळा. घरात मौल्यवान इलेक्ट्रोनिक वस्तूंची खरेदी होईल. मुलांची अभ्यासात छान प्रगती होईल. त्यामुळे घरात चांगले वातावरण राहील. जोडीदाराला कामकाजात साथ द्या. फसवणूक होणार नाही. मातीचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान –  लिननचा पोशाख, सोन्याची साखळी

सिंह – परदेशात चला

दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कदाचित परदेश प्रवासही घडेल. पण त्यामुळे घसघशीत आर्थिक लाभ होईल. आपल्या जोडीदाराला विश्वासात घ्या. म्हणजे मनःस्थिती सकारात्मक राहील. दिवाळीचा फराळ आवर्जून करा. पांढरा रंग लाभदायी. शुभ परिधान –  रेशमी शालू, दागिने

कन्या – छान बदल

बरेच दिवस रखडलेली कामे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण कराल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. छोटासा प्रवास घडेल. त्यामुळे छान बदल अनुभवाल. वादविवादाचे प्रसंग टाळा. वाणीवर संयम ठेवा. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान –  चंदेरी साडी, सुगंध

तूळ – आनंदाचे वातावरण

अचानक धनलाभ होईल. त्यामुळे सगळ्या आर्थिक विवंचना दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. दिवाळीचे स्वागत जल्लोषात कराल. अनेक रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल. साखरेसारखी बातमी मिळेल. गुलाबी रंग लाभदायी.
शुभ परिधान –  कशिदाकारी, पारंपरिक वस्त्र.

वृश्चिक – सर्जनशील घडेल

आपल्या किमती वस्तू जपून ठेवा. आप्तस्वकीयांबरोबर दिवाळीचे स्वागत कराल. त्यामुळे मानस उभारी मिळेल. हातून काहीतरी सर्जनशील घडेल. सतत कार्यमग्न राहा. अविवाहितांना स्थळे सांगून येतील. त्यातूनच विवाह जुळतील. केशरी रंग लाभेल.
शुभ परिधान –  डिझायनर गाऊन, पोवळे

धनु – मनाचे सामर्थ्य

आपल्या अत्यंत जवळच्या माणसांना धरून राहा. त्या सकारात्मक उर्जेचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. सावध राहा. कोणतेही आर्थिक व्यवहार उघड करू नका. पिवळा रंग हा गुरूचा आहे. तो परिधान करा. मनःशक्ती लाभेल.
शुभ परिधान –  पिवळी पैठणी, कुंदनचे दागिने

मकर – कल्पकतेस वाव

लहानाचे हट्ट पुरवा. लांबच्या प्रवासाने मन प्रसन्न होईल. नव्या कल्पना सुचतील. त्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होईल. हातातले काम वेळेत पूर्ण कराल. त्यामुळे कल्पकतेस वाव मिळेल. लेखणीचे बळ जाणवेल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान –  उपरणे, पगडी

कुंभ – उत्साही राहा

मित्रांबरोबर दिवाळीचे स्वागत जल्लोषात कराल. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. उत्साहात कामाला लागाल. तुमच्या यशामुळे घरातील मंडळीही खूश असतील. सोन्याचा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान –  अत्तर, सोन्याचा दागिना

मीन – लगे रहो

कामाचा तणाव जाणवेल. पण चिंता नको. लगे राहो. उत्तम फळ भविष्यात मिळणारा आहे. तुमचे यश अत्यंत निर्भेळ असेल. पाण्यासारखे नितळ. त्यामुळे कसलाही ताण बाळगू नका. तू चाल पुढे तुला रे गडय़ा भीती कोणाची. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – साडी, नासिकालंकार

समस्या –
लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय सांगा. – दिगंबर लाभशेटवार
तोडगा – आपले काम अत्यंत मनःपूर्वक, प्रामाणिकपणे करा. घरातील लक्ष्मी आईच्या प्रतिमेस रोज पिवळ्या शेवंतीचे फूल वाहा.

 

आपली प्रतिक्रिया द्या