साप्ताहिक राशिभविष्य – 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2019

4725

>> मानसी इनामदार

मेष- सर्जनशील दिवस
साहित्यिकांना हा आठवडा खूपच शुभकारक ठरेल. हातून नवसाहित्याची निर्मिती होईल. त्यातून खूप प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे घरात चांगले वातावरण निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. निळा रंग परिधान करा. आहारात मधाचा समावेश करा.
शुभ परिधान – चांदीची अंगठी, जॅकेट.

वृषभ – उद्योगांना चालना
व्यवसाय उद्योगाचा विस्तार करण्याचे विचार मनात सुरू असतील तर त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. बाहेरील शहरात उत्तम संधी मिळेल. पांढरा रंग लाभदायी ठरेल. नोकरीतही कालखंड चांगला आहे. कामास काम ठेवा.
शुभ परिधान – कमरपट्टा, सुगंध.

मिथुन – मित्रांचे सहकार्य
तुमच्या स्वभावातील मित्रप्रेम दाखवणारी तुमची रास. मित्रांचे उत्तम सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. त्याला घरातील बुजुर्ग व्यक्ती आपल्या आशीर्वादाने कळस चढवतील. गुलाबी रंग जवळ बाळगा. प्रेमातही यश मिळेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, गुलाब.

कर्क – वेळ पाळा
भावंडांसोबत छान सुट्टी घालवाल. वाहन खरेदीचे योग आहेत. अवश्य खरेदी करा. तीर्थस्थानी जाण्याचा योग येईल. घरातील ज्येष्ठांशी सल्लामसलत करूनच महत्त्वाचे निर्णय घ्या. त्यांचा अनुभव कामास येईल. लाल रंग जवळ ठेवा. कामाच्या ठिकाणी वेळ पाळा.
शुभ परिधान – साडी, शेवंतीचे फूल.

सिंह – कामाकडे लक्ष
उगाचच मानसिक ताणतणाव वाढतील, पण त्याकडे चक्क दुर्लक्ष करा. आपसूकच वाट मोकळी होईल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. एकाग्रता वाढवा. भगवा रंग जवळ बाळगा. गणपतीच्या उपासनेचा नेम ठेवा. विद्यार्थ्यांनी गणपतीस्तोत्र म्हणावे.
शुभ परिधान – सोन्याचा दागिना, नेलपेंट.

कन्या – चांगल्या घटना
जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल. हलका आहार घ्या. नकारात्मक विचारांपासून स्वतःला लांब ठेवा. खूप चांगल्या घटना आगामी काळात घडणार आहेत. हिरवा रंग नेहमीच लाभदायी.
शुभ परिधान – सनस्क्रीन,लिपस्टिक.

तूळ – सुगरणीचा हात
आळसात वेळ वाया घालवू नका. घरात पाहुण्यांची वर्दळ सुरू राहील, पण स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. उत्तमोत्तम पदार्थ घरात कराल. त्यामुळे जोडीदाराचे मन जिंकून घ्याल. शुभ वार्ता कानी येईल. चांगली साहित्यकृती वाचनात येईल. अबोली रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – चंदन, ओढणी.

वृश्चिक – शांत राहा
स्वभाव विनाकारण चिडचिडा होईल. विष्णू गायत्रीचा जप अवश्य करा. मन शांत आणि कणखर राहील. वास्तूविषयक व्यवहार करा. त्यात आर्थिक लाभ संभवतो. घरातील लहानाचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनास उमेद मिळेल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुती कपडे, लखनवी कुर्ता.

धनु – सहलीला चला
चारचौघात उगाच गप्पा करण्यात वेळ वाया घालवू नका. सदोदित कामात राहा. त्यामुळे मनात वावगे विचार येणार नाहीत. एखादी छोटी सहल आयोजित कराल. अपत्यांची काळजी घ्या. चंदेरी रंग जवळ बाळगा. गाईला घरातून गोग्रास द्या. आर्थिक फायदा होईल.
शुभ परिधान – टाय, रुमाल.

मकर – उत्तम यश
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीस लक्षणीय यश मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरेल. पण तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. काळा रंग जवळ बाळगा. लहान मुलांचे दृष्ट लागण्यापासून रक्षण होईल.
शुभ परिधान – लिनन, रेशीम.

कुंभ – मन रमेल
अवास्तव खर्चांवर आळा घाला. बेफिकिरीने निर्णय घेऊ नका. जुन्या चुका टाळा. हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याच्या मागे राहाल. शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. वैविध्यपूर्ण आहार घ्याल. निळा रंग जवळ ठेवा. हाती घेतलेल्या कामात मन रमेल.
शुभ परिधान – चष्मा, नीलमणी.

मीन – हेही दिवस जातील
मनात चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करा. पैशांचा अपव्यय टाळा. चांगले-वाईट दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. हेही दिवस जातील हे नेहमी लक्षात असू द्या. आवडत्या गोष्टीत मन रमेल. सोनेरी रंग परिधान करा. देवीची उपासना करा.
शुभ – जरीचे वस्त्र, आभूषण.

समस्या – विवाहासाठी प्रयत्नशील आहे. अजून यश नाही. काय करू?  मीनल कवाडे, पुणे
तोडगा – दररोज घरी विठ्ठल-रुखमाईच्या प्रतिमेचे पूजन करा. दहीसाखरेचा नैवद्य दाखवा. तो नैवेद्य स्वतः भक्षण करा.

आपली प्रतिक्रिया द्या