वजन कमी करण्याच्या नादात तरुणी विकलांग झाली

35

सामना ऑनलाईन। नांदेड

वजन कमी करण्यासाठी हल्ली बऱ्याच पद्धतीचे उपचार बाजारात उपलब्ध आहेत. पण त्यातही अनेकांची पसंती निसर्गोपचार पद्धतीलाच अधिक आहे. मात्र हेच निसर्गोपचार पद्धतीचे उपचार नांदेडमधील एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी अत्रे (३३) असे या तरुणीचे नाव आहे. नांदेडमधील निसर्गांजली संस्थेत गौरीवर वजन कमी करण्यासाठी एक थेरपी करण्यात आली. यात तिचे वजन तर कमी झालेच पण या उपचारांमुळे तिला मेंदूचा विकार जडलाय.

ती आता ना बोलू शकत आहे, ना उठू शकत आहे. तिला दृष्टीदोषाबरोबरच कमालीचा अशक्तपणा आला आहे. तिला श्वास घेण्यासही त्रास होत असून विस्मरणाच्या तक्रारीही जाणवू लागल्या आहेत. उपचारांमुळे तिच्या चेतासंस्थेवरच परिणाम झाला असून मेंदूवरचे नियंत्रणच गेले आहे. यामुळे तिला तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिची तपासणी केली असता तिच्या हातावर पायावर व गळ्यावर गाठी झाल्या असून तिचे सर्व शरीरच कंपण करु लागले आहे.

२६ ऑगस्ट २०१७ रोजी डॉक्टर सुनिल कुलकर्णी यांच्या नांदेडमधील निसर्गांजली संस्थेत गौरीला वजन कमी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिचे वजन जास्त असल्याने तिला २१ दिवसांच्या डाएटवर ठेवण्यात आले. या दिवसात गौरीला फक्त काढा देण्यात आला व एनिमा देऊन तिच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यात आले. २१ दिवसानंतर तिला ३५ दिवसांसाठी एक ग्लास पाण्यावर ठेवण्यात आले. या दरम्यान तिला एनिमाही देण्यात येत होता. सप्टेंबर २० पर्यंत हा क्रम सुरू होता.

त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. तिला पातळ पदार्थ घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तिची तब्येत खालावली. तिला अस्पष्ट दिसू लागले, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तिच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ लागला. यामुळे तिला नांदेडमधील जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे तिची तब्येत अधिकच ढासळली. यामुळे तिला हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिच्यावर २० दिवस उपचार करण्यात आले. पण तोपर्यंत तिचे खाणेपिणेही बंद झाले होते. ती फक्त रडत होती. त्यानंतर केलेल्या तपासणीत तिच्या मज्जासंस्थेचे कार्यच बिघडल्याचे निदान झाले. असे गौरीची आई माया भास्कर यांनी सांगितले.

त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१८ रोजी गौरीला पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे केलेल्या तपासणीत भूतकाळातील घटनेचा तिच्यावर परिणाम झाल्यानेच मेंदूचा विकार जडल्याचे सांगण्यात आले. येथील न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजस देशपांडे यांनी सांगितलं की, ” गौरीचा बेसल गॅन्ग्लिया (एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा केंद्रबिंदू) बिघडला आहे. यास अनेक कारण असू शकतात. ऑक्सिजनचा कमी पुरवठा किंवा मेंदूला कमी रक्त पुरवठा, शरीरातील साखरेंचं प्रमाण कमी होणं, जॅपनीज बी व्हायरस यांच्यामुळेही बेसल गॅन्ग्लियाला नुकसान होऊ शकतं. दरम्यान गौरीला कंपन नियंत्रण औषधं देण्यात आली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या