बीरभूम हिंसाचार: केंद्राने प. बंगाल सरकारकडे मागितला रिपोर्ट, हालचालींना वेग

amit-shah-bengal

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप पश्चिम बंगालच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर, खासदारांनी दावा केला की अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाचा 72 तासांत अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

पश्चिम बंगालचे डीजीपी मनोज मालवीय यांनी मंगळवारी दुपारी सांगितले की, या हिंसाचारात 10 नव्हे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले, “आज सकाळी एका घरातून 7 मृतदेह सापडले आहेत. 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, मात्र ही संख्या चुकीची होती. यामध्ये काल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.” या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बंगालचे डीजीपी म्हणाले की, काल रात्री तृणमूल काँग्रेस नेते बहादूर शेख यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर तासाभरात जवळपासची 7-8 घरे जाळण्यात आली. याप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रामपूरहाटचे SDPO आणि प्रभारी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, “संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.”