केंद्रीय यंत्रणांचा पश्चिम बंगालवर हल्ला; ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मोंडल यांना घरातून अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय व तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मोंडल यांना गुरांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयने आज अटक केली. 2020 मध्ये हे प्रकरण घडले होते. ममता बॅनर्जी यांच्यावरील द्वेषापोटीच केंद्र सरकारने मोंडल यांच्यावर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. 2021 मधील निवडणुकीत तृणमूलने भाजपला धोबीपछाड दिला होता. त्या निवडणुकीतील ‘खेला होबे’ या प्रचार कार्यक्रमाची संकल्पना मोंडल यांची होती.

सीबीआयने अनुब्रत मोंडल यांना यापूर्वी चौकशीसाठी तब्बल दहा वेळा समन्स पाठवले होते, परंतु प्रकृतीचे कारण सांगून मोंडल हे चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. त्यांना हायपोक्सियाचा त्रास असल्याने कुठेही जाताना त्यांना ऑक्सिजन सिलिंडर सोबत घ्यावे लागते. गुरांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयने दोन वेळा त्यांचा जबाब नोंदवला होता.

तीन दशके राजकारणात असूनही अनुब्रत मोंडल यांनी अद्याप एकही निवडणूक लढवलेली नाही. पडद्यामागे राहून काम करण्यास ते प्राधान्य देतात.

61 वर्षीय अनुब्रत मोंडल हे तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्हा अध्यक्ष आहेत. ममता बॅनर्जी यांचे ते विश्वासू समजले जातात. त्यांना आदराने ‘केस्टो दा’ नावाने ओळखले जाते. बीरभूममध्ये मोंडल यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या ताकदीमुळेच बीरभूममधील 11 पैकी 10 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. तृणमूलने मोंडल यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये समावेश केला होता.

आठ आयपीएस अधिकाऱयांना ईडीचे समन्स

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालमधील आठ ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱयांना कोळसा तस्करीप्रकरणी आज समन्स पाठवले. त्यात सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ग्यानवंत सिंग, कोटेश्वर राव, एस. सेल्वमुरूगन, श्याम सिंह, राजीव मिश्रा, सुकेश कुमार जैन आणि तथागत बासू यांचा समावेश आहे. त्यांना नवी दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. कोळसा तस्करीतून या पोलीस अधिकाऱयांना कोटय़वधी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. या आठपैकी सात अधिकाऱयांना गेल्या वर्षीही ईडीने समन्स पाठवले होते.