पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा; 29-30 मार्चला करणार सरकारविरोधात आंदोलन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात 29 आणि 30 मार्च रोजी आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकार राज्याची थकबाकी देत नसल्याच्या मुद्द्यावर त्या धरणे आंदोलन करणार आहेत. केंद्राने फक्त पश्चिम बंगालला या वर्षाचे 100 दिवसांच्या कामाचे मनरेगाचे पैसेही दिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरही निधी मिळाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

या निधीच्या मागणीबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी विविध योजनांमधील केंद्राकडून 1.05 लाख कोटी थकबाकी असल्याचे आपण त्यांना सांगितले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते, त्यावेळीही आपण हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच आपण केंद्रालाही अनेकदा पत्रे लिहीली. केंद्र सरकार जाणून बुजून हा निधी रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय केंद्राच्या आदेशानुसार काम करत आहेत. हे देशासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घटनांविरोधात आपण 29-30 मार्च रोजी आपण धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.