पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस मिळणार; ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील सर्व गरजू लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. सर्वांना लस मोफत देण्यासाठी राज्य सरकार व्यवस्था करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात होणार आहे. देशात लसीकरणाला सुरुवात होण्याआधीच पश्चिम बंगालमध्ये सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा बॅनर्जी यांनी केली आहे. देशभरात पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्यसेवक, फ्रंटलाइन वर्कर आणि 50 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्या 3 कोटी आहे. या लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे किंवा नाही, याबाबतची घोषणा केंद्र सरकारने केलेली नाही.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर दिल्लीसह अनेक राज्यांनी सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान आपली सत्ता स्थापन झाल्यास राज्यात सर्वांना मोफत लस देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळे इतर राज्यांनीही कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 294 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांच्या घोषणेला महत्त्व आले आहे. राज्य सरकार राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यासाठी व्यवस्था करत आहे. त्यामुळे राज्यात सर्वांना मोफत लस देण्यात येईल, याची घोषणा करताना आनंद होत असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 58 हजारांवर पोहचली आहे. तर कोरोनामुळे 9881 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 लाख 40 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या