त्यांचं नशीब चांगलंय, नाहीतर एका सेकंदात भाजपच्या कार्यालयावर कब्जा केला असता – ममता बॅनर्जी

सामना ऑनलाईन। कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार उसळला होता. त्यावरून आता राजकारण सुरू झाले असून या हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना ममताही आक्रमक झाल्या असून त्यांच नशीब चांगलं आहे, नाहीतर एका सेकंदात भाजपच्या कार्यालयावर कब्जा केला असता असे ठणकावून सांगत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

तुमच्या लोकांचं नशीब चांगलं आहे की मी अजूनही शांत आहे. नाहीतर एका सेकंदात दिल्लीतील तुमचं भाजप कार्यालय आणि तुमच्या घरांवर कब्जा केला असता,असे दीदींनी भाजपला सुनावले आहे. तसेच अमित शहा काय देव आहेत का की ज्यांच्याविरोधात कोणी निदर्शने करू शकत नाहीत, असा सवालही दीदींनी केला आहे. शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दीदींनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

मंगळवारी कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. यावेळी तृणमूलच्या समर्थकांनी आपल्यावर दगडफेक केली असा आरोप शहा यांनी केला आहे. माझ्या रॅलीच्या वेळी दोन ठिकाणी अशांतता निर्माण करण्यात आली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर वीटा व दगडं फेकली असेही शहा यांनी सांगितले. तर दुसरीकडे शहा यांच्या रोड शोमध्ये दगडफेक झाल्यानंतर कॉलेज स्ट्रीटवर हिंसाचार चिघळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा करत दरवाजा समोरील सर्व वाहने पेटवण्यात आली होती, असे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

याचदरम्यान भाजपवर ईश्वरचंद विद्यासागर कॉलेजमध्ये तोडफोड आणि 19 व्या शतकातील समाज सुधारक विद्यासागर यांचा पुतळा तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावरही दीदींनी शहा यांना लक्ष्य केलं आहे. अमित शहा इतके असभ्य आहेत की त्यांनी विद्यासागर यांचा पुतळाही तोडला. हे सर्वजण बाहेरचे असून भाजपने मतदानाच्या दिवशी जाणीवपूर्वक त्यांना बोलावले असे दीदी यांनी म्हटले आहे.