पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ममता बॅनर्जींनी बोलावली बैठक

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागावंर विजय मिळवत तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपच्या मतांमध्ये 23 टक्क्यांनी वाढ होऊन मताधिक्य 40.3 टक्क्यांवर पोहचले आहे. तर तृणमूल काँग्रेसला 43.3 टक्के मते मिळाली आहेत. तृणमूल काँग्रेसने 42 पैकी 22 जागा जिंकल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फ्कत 2 जागा मिळाल्या होत्या. 2014 च्या तुलनेत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ममता बॅनर्जींच्या तृणमूलसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ममता बॅनर्जींनी शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

ममता बॅनर्जी यांनी कोलकातातील कालीघाट येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला पक्षाच्या आमदार आणि खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपचा वाढता जनाधार तृणमूलासाठी डोकेदुखी ठरत आहे. या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार हरलेले नाहीत. आम्ही बैठकीत पराभवाच्या कारणांची मीमांसा करणार आहोत. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मतांची गणना होण्याची मागणीही ममता यांनी लावून धरली आहे.

ममता यांच्या 10 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून आव्हान देण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपला चांगला जनाधार मिळाला होता. या लोकसभा निवडणुकीत तृणमूलचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. भाजपच्या मतांची टक्केवारी 23 ने वाढली आहे. तृणमूलपेक्षा ही टक्केवारी फक्त तीन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे भाजपचा जोर वाढल्यास ममता यांच्या सरकारला 2021 मध्ये मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे तृणमूलचा गड राखण्यासाठी आणि पक्षाला नवी उभारी देण्यासाठी बैठकीत विचारमंथन होणार आहे.