धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्याने पोटच्या मुलीला विकले

1128

कोरोना व्हायरसमुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गाचे तर खूपच हाल झाले आहेत. पोटापाण्यासाठी मजूर बेहाल झाले आहेत. पश्चिम बंगालमधील मदिनापूर येथे राहणाऱ्या एका जोडप्याचा लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाला. हातात बिलकूल पैसे नसल्याने, खायला काहीही नसल्याने या जोडप्याचे व त्याच्या दोन महिन्यांच्या बाळाचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे या जोडप्याने पैसे मिळविण्यासाठी त्यांच्या बाळाला एका नातेवाईकाला अवघ्या तीन हजार रुपयांत विकल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

बपन धारा व तापसी असे त्या मात्यापित्याचे नाव असून हे दोघेही फरार आहेत. लॉकडाऊन जारी होण्याच्या काही दिवस आधीच तापसीची प्रसूती झाली होती. तापसी काही घरांमध्ये घरकामाची कामे करायचे. मात्र लॉकडाऊनमुळे ती कामं बंद झाली. बपन हा मजूराचं काम करायचा मात्र तेही बंद झाल्यामुळे दोघांवर उपासमारीची वेळ आली. दोन महिने कसेबसे काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला मुलीला विकायचे ठरवले. त्यानुसार सौदाही झाला. बपन व तापसीने मुलीला विकले. त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या घरी येऊन काहीही झाले नसल्यासारखे राहू लागले.

दरम्यान तापसीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला त्यांच्यावर संशय आला. गेल्या दोन दिवसांपासून तिने बाळाला पाहिले देखील नव्हते ना त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. त्याबाबत तिने तापसीला विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तापसी भांबावून गेल्याचे तिच्या नजरेतून सुटले नाही. त्यानंतर तिने याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस तापसीच्या घरी येईपर्यंत दोघेही फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या महिलेची चौकशी केली असता त्यांना तापसीच्या एका मूल नसलेल्या नातेवाईकाविषयी समजले. पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकली असता. त्यांना बाळ त्यांच्याकडेच सापडले. त्यानंतर पोलिसांनी बाळाला व त्याला विकत घेणाऱ्या जोडप्याला ताब्यात घेतले. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सध्या बपन व तापसीचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या