Bengal election भाजपची पहिली यादी जाहीर, ममतादीदींसमोर शुभेंदू अधिकारींचे आव्हान

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठीची ही यादी असून यात नंदीग्राममध्ये भाजपतर्फे शुभेंदू अधिकारी यांना तिकीट देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांचे थेट आव्हान असणार आहे.

शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता त्यांना नंदीग्राममधून तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नंदीग्राममधूनच ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत. शुभेंदू अधिकारी यांच्यासह क्रिकेटपटू अशोक डिंडा यालाही भाजपने मैदानात उतरवले असून त्याला मोयना मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.


50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करणार

दरम्यान, नंदीग्राम मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढणे माझ्यासाठी आव्हानात्मक नसल्याचे म्हटले आहे. मी नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत करून कोलकाताला आल्यापावली धाडणार असल्याचा जबरदस्त विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


आठ टप्प्यात निवडणूक

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी तोंडसुखही घेतले होते. केरळ, पुद्दुचेरी आण तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेऊन कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल त्यांना निवडणूक आयोगाला केला होता.

पहिला टप्पा – 27 मार्च
दुसरा टप्पा – 1 एप्रिल
तिसरा टप्पा – 6 एप्रिल
चौथा टप्पा – 10 एप्रिल
पाचवा टप्पा – 17 एप्रिल
सहावा टप्पा – 22 एप्रिल
सातवा टप्पा – 26 एप्रिल
आठवा टप्पा – 29 एप्रिल

आपली प्रतिक्रिया द्या