धक्कादायक! फेसबुकवर चॅट करताना प्रियकरासमोरच तरुणीची आत्महत्या

33
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये फेसबुकवर प्रियकराशी चॅट करत असताना एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणी आत्महत्या करत असताना या संपूर्ण घटनेचं फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौसमी मिस्त्री असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ती सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी आहे.

तरुणीने ज्या वेळी आत्महत्या केली त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत चॅट करत होती. चॅट करणारी व्यक्ती तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी आपल्या प्रियकराला भेटल्यानंतर तरुणी प्रचंड रागात होती. घरी परतल्यानंतरही तिचा राग कायम होता. तिच्या प्रियकराने तिला फोनही केला होता, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

रविवारी सकाळी मुलीने खोलीचा दरवाजा न उघडल्याने घरच्यांना थोडा संशय आला आणि त्यांनी खिडकीतून पाहिलं असता. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. मृत मुलीच्या वडिलांनी मुलीच्या आत्महत्येसाठी तिच्या प्रियकराला जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी सदर तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मुलीच्या मोबाईलमधील चॅट्सचे स्क्रीनशॉटही घेतले आहेत. तसेच याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या