सीएए समर्थक आणि विरोधक भिडले, देशी बॉम्बचा स्फोट व गोळीबारात दोघांचा मृत्यू

657

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे आंदोलनात हिंसाचार झाला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनादरम्यान देशी बॉम्ब आणि गोळीबार झाल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुर्शिदाबाद येथे भारतीय नागरिक मंचद्वारे बंदची घोषणा करण्यात आली होती. यादरम्यान सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. आंदोलनकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात आणि देशी बॉम्बच्या स्फोटामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. अनिरुद्ध विश्वास आणि मकबूल शेख अशी मृतांची नावे आहेत.

दरम्यान, हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. येथे मोठा भौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. हिंसक आंदोलनामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.

बंगालची ‘शाहिन बाग’
पश्चिम बंगालच्या पार्क सर्कस मैदानावर 60 मुस्लिम महिला गेल्या 23 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या मैदानाला कोलकाताची शाहीन बाग संबोधले जात आहे. या आंदोलनामध्ये गृहिणींसह अनेक नोकरदार महिलाही उतरल्या असून जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे महिलांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या