पश्चिम विभागाचे ऐतिहासिक दुलीप करंडक विजेतेपद,19 वे विक्रमी अजिंक्यपद दक्षिण विभागाला चारली धूळ

हिंदुस्थानचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. किताबी लढतीत त्यांनी दक्षिण विभागाला 294 धावांनी धूळ चारली. पश्चिम विभागाने तब्बल 19 व्यांदा दुलीप करंडकावर आपले नाव कोरले. याआधी पश्चिम विभाग उत्तर विभाग 18-18 जेतेपदांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. किताबी लढतीत दुसऱया डावात दमदार अडीच शतकी खेळी करणारा यशस्वी जैस्वाल या विजयाचा शिल्पकार ठरला, तर मालिकावीराचा बहुमान वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला मिळाला

‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. खेळाडूंनी सामनाधिकारी, पंच व प्रतिस्पर्धी खेळाडू यांचा आदर राखलाच पाहिजे. यशस्वी जैस्वालने सांगितल्यानंतरही पुन्हा स्लेजिंग करणे योग्य नव्हते. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर पाठवणेच योग्य होते, ते मी केले.’

– अजिंक्य रहाणे

पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण विभागाने 327 धावा करीत पहिल्या डावात 57 धावांची आघाडी घेतली होती. मात्र पश्चिम विभागाने यशस्वी जैस्वाल (265), सर्फराज खान (नाबाद 127), श्रेयस अय्यर (71) व हेत पटेल (नाबाद 51) यांच्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर दुसरा डाव 4 बाद 585 धावसंख्येवर घोषित करून दक्षिण संघाला जिंकण्यासाठी 529 धावांचे लक्ष्य दिले, मात्र दक्षिण विभागाचा दुसरा डाव 71.2 षटकांत 234 धावांवरच संपुष्टात आल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दक्षिण विभागाने चौथ्या दिवसाच्या 6 बाद 154 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. रवी तेजाने 97 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकारांसह 53 धावांची खेळी करीत आपल्या संघाचा पराभव थोडाफार लांबवला. तळाच्या फलंदाजांची त्याला फारशी साथ मिळाली नाही व त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.

स्लेजिंगमुळे जैस्वालला कर्णधाराने मैदानाबाहेर काढले

अंतिम लढतीत पश्चिम विभागाचा यशस्वी जैस्वाल दक्षिण विभागाच्या फलंदाजांची खासकरून रवी तेजासोबत सतत स्लेजिंग करत होता. पंचांनी जैस्वालला दोन-तीन वेळा याबद्दल समजही दिली. पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही जैस्वालला समजावले व रवी तेजाशीदेखील चर्चा करून प्रकरण मिटवले, मात्र 57 व्या षटकांत जैस्वालने पुन्हा एकदा स्लेजिंग केल्याने पंचांनी कर्णधार अजिंक्य रहाणेशी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर पाठवून तमाम क्रिकेटपटूंना मैदानावर सभ्यता पाळण्याचा मोठा संदेश दिला. पंचांनी राखीव खेळाडूला क्षेत्ररक्षणासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे रहाणेच्या संघाला 7 षटके 10 खेळाडूंसह मैदानावर क्षेत्ररक्षण करावे लागले. 65 व्या षटकांत जैस्वालला पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी बोलावण्यात आले.