रशियाने कोरोनावर बनवली लस, पण पाश्चिमात्य देशांचा नाही विश्वास

934

रशियाने कोरोनावर लस बनवल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. जगातील अनेक देशांनी या लसीची मागणीही केली आहे. पण अमेरिका, इंग्लड सारख्या अनेक देशांनी रशियाच्या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रशियाने जेव्हा आपली लस बनवली तेव्हा त्याची माहिती सार्वजनिक केली नव्हती. ज्याप्रमाणे अमेरिका, इग्लंडने लसनिर्मिती करताना आपले रीसर्च, पेपर जाहीर केले होते तेव्हा रशियाने माहिती दडवली होती. रशियाने नेमकी चाचणी कधी सुरू केली? त्याला किती वेळ लागला, त्यात किती रुग्णांचा समावेश होता, त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? या लसीचा किती रुग्णांना फरक पडला याबाबत रशियाने कुठलीच माहिती न दिल्याने पाश्चिमात्य देशांमध्ये याबाबत संदिग्धता आहे.

कुठलीही लस बनवताना त्याचा तिसरा टप्पा महत्त्वाचा असतो. हजारो लोकांवर लसीचा प्रयोग केल्यानंत लसीचा प्रभाव किती आहे हे पाहिले जाते. पण रशियाच्या कोरोनावरील लसीची क्लिनिकल ट्रायल अजून बाकी आहे. रशियात बनवण्यात आलेल्या लसीचा प्रयोग आधी माकडांवर करण्यात आला नंतर माणसांवर करण्यात आला होता. ही लस यशस्वी असल्याचे रशियाने म्हटले आहे. पण ज्या संस्थेने ही लस बनवली आहे, ती संस्था Gamaleya Instituteने मोठ्या प्रमाणात या लसीची चाचणी केलेली नाही. म्हणून या लसीचे तोटे, धोके अजून कळालेले नाही.

न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार राजकीय हेतुने प्रेरित रशियाने घाई घाईत लस शोधल्याचा दावा केला आहे. तसेच पारंपारिक मार्ग सोडून लस बनवू नये अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने रशियाला सूचना दिली होती.

असे असले तरी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सांगितले की ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ती कोरोना संपवण्यासाठी प्रभावी आहे. तसेच पुतीन यांनी जोर देऊ सांगितले की सगळ्या चाचण्या केल्यानंतरच ही लस बनवण्यात आली आहे. न्यु यॉर्क टाईम्सने रशियन सरकारला लसीच्या मानवी चाचणी, साईड इफेक्ट्स आणि त्याच्या संशोधनाबद्दल विस्तृत प्रश्न पाठवले होते. पण रशियन सरकारने याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती.

तसेच अमेरिका, कॅनडा आणि इंग्लडने रशियावर लसीसंबधी रिसर्च चोरण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये रशियाबद्दल संशय बळावला आहे. असे असले तरी रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या