गारेगार सह्याद्री

67

श्रीकांत उंडाळकर

शहरातल्या, गावातल्या थंडीचा अनुभव आपण घेतच असतो. पण खऱयाखुऱया थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर सह्याद्रीचे सुळके चढायलाच हवेत.

थंडीत अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी जायचे बेत आखत असतात. बरेचजण या मोसमात एक वेगळा अनुभव घेण्यासाठी बर्फाळ प्रदेशात जाण्याचा किंवा एखाद्या उंच प्रदेशातील स्थळांना भेट देण्याचा किंवा एखाद्या आडवाटेवरील ठिकाणास भेट देण्याबद्दल ठरवत असतात. या सर्वांमध्ये एकसारखी असणारी गोष्ट म्हणजे या दिवसांतील थंडी. महाराष्ट्रातही यावर्षी खूपच छान किंबहुना मागील अनेक वर्षांपेक्षा जास्त थंडी पडलेली आहे. अशा या कार्यक्रमादरम्यानचे अनुभव इथे मांडत आहे.

उन्हाळ्यात मोहीम किंवा एखादा मोठा ट्रेक करणे तुरळक लोकं करतात. पावसाळ्यात ट्रेक करताना रस्ते निसरडे होतात किंवा जास्त पाऊस पडला तर कधी कधी मोहिमा पण रद्द कराव्या लागतात. त्यामुळे थंडीत ट्रेक करणे अगदीच आल्हाददायक ठरते. डोंगरावर, किल्ल्यावर वा जंगलातील थंडी अनुभवणे म्हणजे एक मजेशीर अनुभव असतो. थंडीच्या दिवसांत ट्रेकला जाताना स्वेटर, माकडटोपी वा कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे, कॅरी मॅट, जाड पांघरूण किंवा स्लीपिंग बॅग या वस्तू जवळ बाळगणे अत्यावश्यक असते.

नुकताच मकर संक्रांतीचा सण होऊन गेलाय. माघाची थंडी अजून यायचीय… तर चला मग, थंडीच्या दिवसातील ट्रेकची मजा लुटण्यासाठी एखाद्या छान किल्ल्याची किंवा अडवाटेवरील स्थळाची वा डोंगराची निवड करा आणि लगेचच तिकडे भेट द्या.

ट्रेक किंवा गडकिल्ल्यावर मुक्काम करायचा असल्यास मंदिर वा गुहा अशा ठिकाणी राहणे योग्य ठरते. काही ठिकाणी अशा गोष्टी उपलब्ध नसतात तेव्हा अनेक लोक टेंट ठोकून मुक्काम करतात. अशा वेळी गडमाथ्यावर जेवण करायचे असते तेव्हा थंड वातावरणामुळे धम्माल येते. जेवण करतानाची ‘चूल’ही शेकोटीचे पण काम करते. थंडीच्या दिवसांत डोंगर दऱयांमध्ये सीताफळं, पेरू, बोरं या फळांची रेलचेल असल्यामुळे याचाही आनंद लुटता येतो. तीन ते चार दिवसांचे ट्रेक, सुळक्यांची चढाई अशा मोहिमा हिवाळ्यामध्येच आखल्या जातात कारण दगड लवकर तापत नाही, उन्हाचा त्रास कमी असतो तसेच वाटही कमी प्रमाणात निसरडी असते आणि पाणी देखील पुरेसे उपलब्ध असते.

सहन न होणारी थंडी

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडले असा सह्याद्री रांगेतील ‘रायगड’ हा कोकणात आहे. या परिसरात थोडेफार दमट हवामान असल्याने घाटावर किंवा मराठवाडा वा विदर्भात असणाऱया कडाक्याचा गारठा रायगडावर नसतो. ‘राजांचा गड आणि गडांचा राजा’ असे ज्याला संबोधले जाते असा राजगड किल्ला आणि त्याच्या बाजूला असणाऱया तोरणा या दोन्ही गडांची उंची साधारण सारखीच आहे. हे दोन्ही किल्ले घाट आणि कोकणाला जोडणारे आहेत. या परिसरात कोरडी हवा असल्याने इथे पडणारी थंडी ही आपण सहन करू शकतो. मात्र नाशिककडील किल्ले, बागलाण, सातमाळ, अजिंठा परिसरातील किंवा अगदी सोलापूरजवळील भुईकोट किल्ले या सर्वच ठिकाणी या काळात खूप कडाक्याची थंडी असते. याचे कारण म्हणजे या सर्व परिसरात कोरडय़ा हवेसोबतच लांबवर पसरलेला मोकळा भूभाग आणि त्या भागात असणारे उंचच उंच डोंगर. या भागातील किल्ले हे अशाच डोंगर माथ्यावर बांधलेले असल्याने तेथे खूप जास्त थंडी लागते.

अशी करा सुरुवात

पहाटे ताजेतवाने होऊन दवबिंदूंनी ओल्या झालेल्या रस्त्यावरून संपूर्ण आसमंत शांत आणि नि:शब्द असताना, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होण्याआधी एखादा ट्रेक करण्यास किंवा गड किल्ला चढण्यास जेव्हा सुरुवात केली जाते, तेव्हा पहाटेचा झोंबणारा वारा तर कधी कधी मध्येच वाहत येणारी थंड वाऱयाची झुळूक आपल्या पावलांचा वेग वाढवत असते. निसर्गाचे हे रूप आपण डोळ्यांत साठवून ठेवावे असे असते. हे सर्व पाहात पाहात उरलेला रस्ता आपण कधी पूर्ण करतो ते लक्षातच येत नाही. निसर्गाचे हे आगळे वेगळे रूप खूपच छान अनुभव देऊन जाते.

आपली प्रतिक्रिया द्या