विफाची दुसऱ्या स्थानावर झेप; एआयएफएफकडून देशातील सर्वोत्तम संघटनांची यादी जाहीर

285

मुंबईतील फुटबॉलला सुवर्ण झळाळी मिळाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपाध्यक्ष असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशननेही (विफा) मोठी झेप घेतली आहे. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल असोसिएशनने (एआयएफएफ) बुधवारी 2019-20 सालातील सर्वोत्तम संघटनांच्या नावांची घोषणा केली. विफाने या यादीत दुसर्या स्थानावर झेप घेतली असून या यादीत पश्चिम बंगाल पहिल्या व केरळ तिसर्या स्थानावर आहे. वर्षभरात घेण्यात आलेल्या स्पर्धा, कोर्सेस, पायाभूत सुविधांवर करण्यात आलेली मेहनत आदी बाबींच्या निकषांवर ही क्रमवारी देण्यात आलेली आहे.

‘डी’ लायसेन्स व रेफ्री एज्युकेशन कोर्सेस

या कालावधीत विफाकडून 14 एआयएफएफ ‘डी’ लायसेन्स कोर्सेसचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 352 उमेदवारांचा समावेश होता. यामधील 284 उमेदवारांना ‘डी’ लायसेन्स प्राप्त झाले. एवढेच नव्हे तर एआयएफएफकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ई’ लायसेन्स कोर्सचेही विफाकडून आयोजन करण्यात आले. तसेच विफाकडून घेण्यात आलेल्या दोन रेफ्री एज्युकेशन कोर्सेसलाही उदंड प्रतिसाद लाभला.

स्पर्धांचे यशस्वी आयोजन

विफाकडून 2019-20मध्ये प्रतिष्ठत स्पर्धांचेही यशस्वी आयोजन करण्यात आले. आंतरजिल्हा सीनियर पुरूषांच्या चॅम्पियनशिपचे कोल्हापूरमध्ये तर आंतरजिल्हा महिलांच्या चॅम्पियनशिपचे जळगावमध्ये आयोजन करण्यात आले. तसेच आंतरजिल्हा सबज्युनियर मुलींची स्पर्धा पालघर येथे खेळवण्यात आली. विफा महिलांची चॅम्पियनशिपही दिमाखात पार पडली. तसेच स्वीडन, थायलंड व हिंदुस्थान या देशांमधील तिरंगी आंतरराष्ट्रीय मालिकेलाही तूफान प्रतिसाद लाभला.

34 जिल्हे अन् 1200च्यावर क्लब्सचा समावेश

विफाच्या अंतर्गत 34 जिह्यांचा तसेच 1200च्यावर क्लब्सचा समावेश आहे. मुंबईतील फुटबॉलने उत्तुंग झेप घेतली आहे. येथे 500वर ऍकॅडमींची स्थापना झाली असून त्यामुळे विकासाला आणखीनच गती मिळाली आहे. एआयएफएफ मान्यताप्राप्त 18 ऍकॅडमी महाराष्ट्रात आहेत. लायसेन्सशी निगडीत लागणाऱया बाबींसाठी मोठी बाब आहे.

आपली प्रतिक्रिया द्या