‘परे’ने डहाणू लोकलची वेळ बदलल्याने नर्सिंग स्टाफचे मस्टर होतेय मिस, मॉर्निंग शिफ्टला फटका

405
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी लोकलच्या विशेष फेर्‍या सुरू  केल्या खर्‍या परंतू सकाळी ५ वाजता सुटणार्‍या लोकलची वेळ बदलत ती ५.४० केल्याने डहाणू, पालघर, बोयसरहून सकाळ सातची पहिली पाळी गाठणार्‍या मुंबईतील केईएम, नायर आदी रूग्णालयांच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांचे मस्टर मिस होत आहे. त्यामुळे रोजचा लेटमार्क बसल्याने कर्मचार्‍यांना त्याचा जबर फटका बसत आहे.

राज्य सरकारने अनलॉक सुरू करताना खाजगी आणि सरकारी कार्यालयांना ठराविक कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनूसार १५ जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसोयीकरीता मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आल्या. डहाणू येथून पूर्वी सकाळी ५.००वाजता सुटणारी मेमू बंद करीत सरकारने लोकल सुरू करताना तिची वेळ सकाळची ५.४० केल्याने विरार, बोरीवलीपासून ते मुंबईतील महत्वाच्या रूग्णालयातील निमवैद्यकीय कर्मचार्‍यांना सकाळची पहिली सात वाजताची पाळी गाठणे कठीण बनले आहे. त्यामुळे रोजचे मस्टर मिस होत असून तसेच हॉस्टिपलच्या नर्सेसना त्यांच्या रिलिव्हरना मोकळे करता येत नसल्याने दोन्हीकडून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे वैद्यकीय कर्मचारी सोनाली घरत यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.

विरारहून गाडी बदलताना ‘सोशल डिस्टन्सिंग’तीन तेरा
डहाणूवरून विरारला आधी मेमू चालविल्या जायच्या, ती अचानक बंद करून लोकल चालविण्यात येत असली तरी तिची वेळ सकाळी ५ ऐवजी ५.४० केल्याने  बायोमेट्रीक हजेरीचे गणित चुकत आहे. शिवाय विरारही गाडी आली की तिचा फलाट निश्चित नसल्याने विरारहून पुन्हा बोरीवलीची गाडी पकडताना पळापळ होत असल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ सगळे नियम मोडले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात बोयसर आणि पालघरच्या स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यासाठी हॉस्पिटलच्या नर्सेस गेल्या असताना त्यांना मुंबई सेंट्रल जाऊन पत्र द्या असे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या