जानेवारीपासून ‘परे’वर पंधरा डब्यांच्या फेऱ्या वाढणार

21

सामना प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम रेल्वेचा अंधेरी ते विरारदरम्यानचा धकाधकीचा लोकल प्रवास सुसहय़ करण्यासाठी अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर 15 डब्यांची लोकल चालविण्याच्या प्रकल्पाला लवकरच चालना मिळणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यंदा या प्रकल्पासाठी 12 कोटी रुपये मंजूर झाल्याने कामांना वेग येणार असून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर पंधरा डबा लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला, विशेषतः मुंबई उपनगरीय लोकलला नेमके किती बजेट मंजूर झाले याची माहिती पुढे आली असून एमयूटीपी प्रकल्पांकरिता एकूण 584.7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार धीम्या मार्गावरील 15 डबा लोकल प्रकल्पाकरिता एकूण 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पासाठी अंधेरी ते विरारदरम्यानचे धीम्या मार्गाचे फलाट वाढविण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 59.53 कोटी इतका आहे.

जानेवारीपासून 15 डब्यांच्या फेऱ्यांत वाढ
पश्चिम रेल्वेकडे चर्चगेट ते विरार जलद मार्गावर चालविण्यासाठी 15 डब्यांच्या पाच लोकल असून त्याच्या एकूण 54 फेऱया दिवसभरात होतात. अंधेरी व विरारदरम्यान 15 डबा चालविण्यासाठी सुरू असलेल्या कामापैकी इंजिनीअरिंगचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. ओव्हरहेड ट्रक्शन आणि सिग्नलिंगचे काम शिल्लक असून डिसेंबरपर्यंत फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण हेणार आहे, तर जून 2020 पर्यंत सर्व काम पूर्ण होणार असले तरी जानेवारीपासून 15 डब्यांच्या फेऱया वाढणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या पंधरा डबा लोकलची स्थिती
चर्चगेट ते विरार रोजच्या फेऱया
एकूण पंधरा डबा लोकल – 5
एकूण फेऱ्यांची संख्या – 54

आपली प्रतिक्रिया द्या