हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला फायनलच्या आधी अपात्र ठरवल्याविरोधातील निर्णय 16 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही? याबाबत क्रीडा लवादाकडून मंगळवारी निर्णय सुनावला होता. मात्र मागच्या आठवड्याच्या आत तिसऱ्यांदा निर्णयाची वेळ टाळण्यात आली आहे. दरम्यान, कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेच्या निर्णयाला झालेल्या विलंबावर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्थानच्या कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश चौधरी यांनी अपात्रतेच्या प्रकरणात विनेशच्या बाजूने काहीतरी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात अनेक बड्या लोकांचा सहभाग असून आपल्याला पदक मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हिदुस्थानच्या कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष जय प्रकाश चौधरी यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. असं व्हायला नको होतं. मात्र, मला वाटतं की, विनेशच्या बाजूने काही ना काही नक्की येईल. काही शक्तीशाली लोक यात सहभागी आहेत आणि तिला पदक मिळेल. मी म्हणेन की हा त्यांच्या स्टाफचा दोष आहे. वजन कसे कमी करायचे हे त्यांचे काम आहे. मात्र 16 ऑगस्टला काय होते ते बघूया. मोठे वकील आहेत, पंतप्रधान मोदींनीही त्याची दखल घेतली आहे आणि मला वाटते निर्णय आमच्या बाजूने होईल, असे जय प्रकाश चौधरी म्हणाले.
हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या माहितीनुसार, क्रीडा लवादाच्या त्या संबंधित विभागाच्या अध्यक्षांनी विनेश फोगाट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रकरणात आपला निर्णय देण्यासाठी एकमेव मध्यस्थ डॉ. ॲनाबेले बेनेट यांची नियुक्ती केली आहे.