टिवल्या-बावल्या: असेही वाचक

239

>>शिरीष कणेकर ([email protected])

झोटिंगराव की असंच कायसं आडझोड नाव असलेल्या वाचकाचा मला फोन आला. अलीकडे वाचकांच्या फोनना मी वचकून असतो. बरेचसे प्रेमाने, कौतुकानं भारावून फोन करतात. भरभरून बोलतात, शुभेच्छा देतात. मनाला उभारी येते. लिहायला हुरूप येतो. याचसाठी केला होता अट्टहास ही कृतकृत्य भावना तप्त मनावर गुलाबपाणी शिंपडते, पण एखादा बहाद्दर असा निपजतो की वाटतं, लेखक होण्याऐवजी आपण महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या खात्यात लागायला हवं होतं. पण तो वाचकच त्या खात्यात असतो व मी त्याचं लक्ष्य नि भक्ष्य उंदीर असतो असं थोड्या संभाषणानंतर मला वाटायला लागतं.
‘‘काय समजता हो तुम्ही स्वत:ला?’’ तो प्राणच्या आवाजात विचारतो.

असल्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचं असतं, मला कळलेलं नाही. काय समजतो विचारताय ना, हे-हे समजतो असं दहा पंधरा मिनिटे चालणारे लांबलचक उत्तर द्यायचं असतं का? बरं, त्यानंतर त्याचं समाधान होण्याची कितपत शक्यता आहे? शून्य. तुमचं भाषण ऐकायला त्यानं फोन केलेला नसतो तर तुम्हाला चार गोष्टी सुनवायला त्यानं फोन केलेला असतो. एखाद दिवशी ‘सुन सायबा सुन’ किंवा ‘हमारी भी सुनो’ असं एखादं गाणं मी म्हणेन व माझ्या डोक्याविषयी म्हणजे डोकं कामातून गेल्याविषयी त्याची खात्री पटेल व तो पुन्हा फोन करणार नाही. काय सांगावं, तोही पलीकडून गायला लागायचा. माझ्या लेखनावरून संगीत जुगलबंदी ही कल्पना वाईट नाही.
पुढचा प्रश्‍न : ‘तुम्हाला कशातलं काही कळतं का हो?’

या प्रश्‍नावरही मी मला कशाकशातलं काय काय कळतं याची समग्र यादी सादर करावी अशी अपेक्षा असते का? मुळीच नाही. फोनवरून अदृश्य राहून दुरून शाब्दिक चपराक मारण्याचे हे प्रकार आहेत. तुम्ही मूर्खासारखे संवाद चालू ठेवलेत तर संयमाचा बांध फुटून तुमचा अनामिक मारेकरी एकदम ‘अरे-तुरे’वर येतो. आता शिव्या काही फार लांब नसतात.

असाच एक वाचक स्वत:चं नाव उघड न करता मला नेहमी फोन करायचा. डोकं फिरवणारं बोलायचा. एकदा त्यानं नवीन पिल्लू सोडलं – ‘‘मला तुमचं पुस्तक काढायचंय.’’
‘‘तुम्ही प्रकाशक आहात?’’ मी आश्‍चर्यानं विचारलं.
‘‘हो, आम्ही तुम्हाला तीन लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देऊ.’’ तो आढ्यतेनं म्हणाला.
इथेच तो फसला होता. तीन लाख रुपये? तेही अ‍ॅडव्हान्स? मराठी लेखकाचा पुस्तक व्यवहार त्याला अर्थातच माहीत नव्हता. एवढे मोठे आकडे आम्ही कधी ऐकत नसतो हे त्याला ठाऊक नव्हतं. तीन लाख आकड्यानं तोंडाला पाणी सुटणं दूरच, उलट मी सावध झालो व त्याचा फोन उचलल्या उचलल्या ठेवू लागलो. आता तो बहुधा पाच लाखांची ‘ऑफर’ देईल. तेही पाचशे रुपयांच्या नव्या नोटात. बोलायला काय लागतंय? देणं नाही, घेणं नाही.

लेखक हा बागेसारखा सार्वजनिक संपत्ती असतो. कुणीही भडभुंजानं यावं आणि थुंकावं. हटकणारं कोण आहे? ‘येथे थुंकू नये’ अशी पाटी गळ्यात अडकूनही काही उपयोग नाही.

शिवाजी पार्कच्या कट्ट्याभोवती एक वकील फिरायचा. खरं म्हणजे घुटमळायचा. तो कायम काळा कोट घालायचा म्हणून वकील. एरवी तो कुठल्या कोर्टात प्रॅक्टिस करायचा हे गौडबंगालच होतं. कायद्यापेक्षा त्याचा महिलांचा अभ्यास दांडगा होता एवढं नक्की. एकदा मी व अविनाश खर्शीकर कट्ट्यावर हजर नसलेल्यांविषयी वाईट बोलत बसलो होतो. वकील समोर येऊन उभा राहिला. तो इतका खेटून उभा राहिला होता की, मी त्याच्या शर्टाचं बटण शिवू शकलो असतो.
‘‘शिरीष कणेकर.’’ तो म्हणाला.
‘‘बोला.’’ मी बोललो.
‘‘तुम्ही चांगलं का लिहीत नाही?’’
नाही म्हटलं तरी मी नर्व्हस झालो. काय उत्तर देऊ? माझ्यापेक्षा अविनाश खर्शीकरलाच राग आला.
‘‘ओ काळा कोटवाले,’’ तो गरजला, ‘‘आम्ही विचारतो का तुम्हाला की रस्त्यात तुम्ही बायकांकडे बघत का उभे राहता ते.’’
वास्तविक त्याच्या व अविनाशच्या विधानाचा काहीही संबंध नव्हता, पण तो तिथून काहीही न बोलता चालू पडला. हा माझा फायदा.

‘‘वेडा आहे तो.’’ अविनाश मला सांत्वनपर म्हणाला.

‘‘काही वेडे वर्षातून एकदा शहाण्यासारखं बोलतात. तो आजचा दिवस असेल तर?’’ मी म्हणालो.
त्यापुढे कळत नकळत मी त्या वकिलाला टाळू लागलो. त्यानंही माझा नाद सोडून बायकांवर लक्ष केंद्रित केलं. शेवटी करीअर महत्त्वाची.

सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणं त्या कोणा झोटिंगरावाचा फोन आला. बाळ नवसाचं असावं. म्हणून असं नाव ठेवलं असावं.
‘‘माझे सासरे तुमचं आत्मचरित्र ‘मी माझं मला’ वाचता वाचताच गेले.’’ तो उत्साहानं म्हणाला.

मला कसं ‘रिअ‍ॅक्ट’ व्हावं हेच सुधरेना. ‘छान झालं, सुटलात. माझे आभार मानण्याची गरज नाही’ असं म्हणू? ‘अरेरे! हे काय भयंकर झालं? कोणी दिलं त्यांना माझं आत्मचरित्र वाचायला? त्यापेक्षा भालचंद्र नेमाडेंची ‘हिंदू’ वाचायला द्यायची. ते भोग भोगण्यासाठी तरी ते जगलेच असते असं म्हणू? ‘पाहिलंत ना’ माझं आत्मचरित्र किती परिणामकारक आहे ते? आता तीच कॉपी सासूबाईंना वाचायला द्या. सवडीनं पार्टी करू’ असं म्हणू? काय म्हणू तरी काय? मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल उद्या पोलीस माझ्या दाराशी येतील. त्यांनाही वाचायला देऊ का? ही गोष्ट पसरली तर माझ्या आत्मचरित्राला जगभरातून प्रचंड मागणी येईल. त्याची भाषांतरे होतील. हिलरी क्लिंटन ते डोनाल्ड ट्रंपला वाचायला देईल.

एक खबरदारी मात्र मला घ्यावी लागेल. माझं पुस्तक मी स्वत: चुकूनही वाचायचं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या