लाभार्थींच्या जाहिराती आल्या, पण शेतकरी कर्जमुक्त झाला का?- उद्धव ठाकरे

87

सामना प्रतिनिधी । कन्नड

कर्जमाफीचे ढोलनगारे वाजले, होर्डिंगबाजी झाली, पण शेतकरी कर्जमुक्त झाला का? तो अजूनही कर्जमाफीची वाट पाहत रांगेतच उभा आहे आणि सरकारकडून होय, मी लाभार्थीची जाहिरातबाजी सुरू आहे. तुम्ही लाभार्थी नाहीत म्हणजे देशद्रोही! लाज वाटते या सरकारची! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला म्हणजे झालाच पाहिजे. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. शिवरायांच्या नावाने आणलेल्या कर्जमाफीच्या योजनेला काळिमा फासू देणार नाही, असा जबरदस्त इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

कन्नड येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘रायभानजी जाधव: व्यक्ती आणि विचार’ या तेजस्विनी जाधव लिखित पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्व. रायभान जाधव यांचे सुपुत्र कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यास कन्नड तालुक्यातील जनतेने प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेचा आसुड ओढला. शिवसेनेने रान उठवले आणि सरकारला कर्जमाफी करण्यास भाग पाडले. पण ही कर्जमाफी अजूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सरकार मात्र होय, मी लाभार्थीच्या जाहिरातबाजीत दंग आहे. कुणाकुणाची कर्ज माफी झाली असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी नाही नाही असा पुकारा केला. त्यावर तुम्ही लाभार्थी नाहीत म्हणजे देशद्रोही आहात, असा टोला लगावला. शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जमाफीसाठी आवाज उठवला तर शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

सिंचनाचा प्रश्न रखडलेलाच

सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये कुठे गेले? सिंचन घोटाळय़ाचे पुरावे कुठे गेले? काय झाले त्याचे? सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. हे सरकार जुनीच कामे पुढे रेटत आहे. नव्या योजना नाहीत. केवळ आहे त्या जुन्या योजनांची बिले मात्र फुगवली जात आहेत. हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आहे. याचे भान सरकारने ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांचा नया पैसाही व्यर्थ जाणार नाही, सिंचनाची कामे झालीच पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बजावले.

रायभान जाधव यांचे विचार आजही महत्त्वाचे
रायभान जाधव हे अभ्यासू होते. ग्रामीण भागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकासात्मक होता. विकासाचा पाझर गावखेड्यांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांचे विचार आजही प्रेरणा देणारे आहेत, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. हर्षवर्धन जाधवही त्याच मार्गाने जात आहेत याचे आम्हाला कौतुक आहे. हर्षवर्धन यांनी रागावर नियंत्रण ठेवावे असा सल्लाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
याप्रसंगी माजी आमदार तेजस्विनी जाधव, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख किनोद घोसाळकर, पशुसंकर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, प्रवक्त्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱहे, संभाजीनगरचे महापौर नंदकुमार घोडेले, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानके, नरेंद्र त्रिकेदी, आमदार हर्षकर्धन जाधक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विधिमंडळ ग्रंथालयाचे ग्रंथपाल बाबा वाघमारे, माजी जि. प. सदस्या संजना जाधव आदींची उपस्थिती होती.

शेतकरी जगवा, तो तुम्हाला जगवेल

रायभान जाधव हे माझे जीवलग मित्र. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक पाहून मला अतिशय आनंद झाला. ग्रामीण भागातून आलेले रायभान जाधव आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे जगभरात पोहोचले. अशी ही मोठी माणसे अशा शब्दांत ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी रायभान जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रायभान जाधव यांनी पोटतिडीकेने शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडले. आज शेतकऱयांची ससेहोलपट सुरू आहे. त्याला कोणी वाली राहिला नाही. शेतकऱ्याला तांत्रिक बाबी कळत नाहीत. त्याला कशाला अडकवता तांत्रिक भुलभुलैयात. शेतमालाला भाव द्या, शेतकरी आनंदी होईल, असे महानोर म्हणाले. रायभान जाधव यांच्याच मार्गावर हर्षवर्धन जाधव जात आहेत. त्यांनी शांतता ठेवून उद्धव ठाकरे सांगतील तसेच करावे, असा वडिलकीचा सल्लाही यावेळी महानोर यांनी दिला.

नोट बंदीमुळे गरिबांचे हाल

नोटा बंदीमुळे श्रीमंतांना चाप बसेल असे काटले होते. मात्र एकही सेठ रस्त्याकर आला नाही. रस्त्याकर रांगेत उभा राहून गरीब मेला, शेतकरी मेला. नोटाबंदीच्या रांगेत एकही श्रीमंत मेल्याचे ऐकिवात आले नाही. ही लोकशाही असूच शकत नाही. नोटाबंदीच्या रांगेत सोसलेल्या हालअपेष्टांचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

सिंचनाचे 70 हजार कोटी रुपये कुठे गेले? सिंचन घोटाळय़ाचे पुरावे कुठे गेले? काय झाले त्याचे? सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत.

ही लोकशाही आहे का?

गुजरातमध्ये काय चालू आहे हे साऱ्यांनाच माहीत आहे. एका राज्याच्या निवडणुकीसाठी संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले जाते याला लोकशाही म्हणायचे का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. देशाचे प्रश्न सोडून पंतप्रधान गुजरातमध्ये पन्नास पन्नास सभा घेतात. सगळेच संताप आणणारे आहे. हे कसले सरकार अन् कसली लोकशाही असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या