हिटलरने जे जर्मनीत केले, तेच आज हिंदुस्थानात होत आहे – कॅप्टन अमरिंदर सिंग

717

पंजाब विधानसभेत शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा देशातील धर्मनिरपेक्ष धोरणाच्या विरोधात असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले. जर्मनीमध्ये अॅडॉल्फ हिटलरने 1930 मध्ये जे केले होते, तेच आज हिंदुस्थानात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कायद्याविरोधातील प्रस्तावाच्या चर्चेत हा कायदा दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याने देशावर विभाजनाचे संकट येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

देशात सध्या होत असलेल्या घटना दुर्दैवी आहेत. देशाची धर्मनिरपेक्ष ही ओळख कोणालाही बदलता येणार नाही. जे होत आहे ते दुःखद आहे. फक्त राजकारणासाठी काहीजण या देशातील सौहार्द आणि बंधुभाव धोक्यात आणत आहेत. त्यावरून इतिहासातून आम्ही काहीच शिकलो नाही, हे दिसून येते असेही ते म्हणाले. पंजाबच्या विधानसभेत शुक्रवारी सीएए विरोधातील प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. तसेच हा कायदा मागे घेण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली. एनपीएमधील दस्तावेज अद्ययावत करावेत, तसेच जनतेतील याबाबतचा संभ्रम दूर होत नाही, तोपर्यंत याचे काम थांबावावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हिटलरने 1930 मध्ये जे जातीय धोरण राबवले होते, तेच आज हिंदुस्थानात होत आहे. जर्मनीतील नागरिकांनी त्यावेळी अशा घटनांविरोधात आवाज उठवला नाही. अशा घटनांबाबत ते खेद व्यक्त करत होते. त्यामुळे आता आपल्याला खेद व्यक्त करून चालणार नाही. जातीयवादी शक्तीविरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल, असेही सिंग म्हणाले. विरोधी पक्षांनी विशेष करून अकाली दलाने हिटलरचे ‘माइन कॅम्फ’ माझी लढाई हे पुस्तक वाचावे, म्हणजे त्यांना देशासमोरील धोक्याची जाणीव होईल, असे आवाहन सिंग यांनी केले. या पुस्तकाचे पंजाबीत भाषांतर करून त्याच्या प्रती वाटण्यात येतील, जनतेने हे पुस्तक वाचावे म्हणजे त्याकाळाच हिटलरने जर्मनीत जे केले त्याचा अंदाज येईल आणि देशासमोरील हे संकट टाळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. या कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. हे अयोग्य असल्याची टीकाही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या