केजरीवाल, ‘आप’ का क्या होगा?

40

>>नीलेश कुलकर्णी   [email protected]

गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांत ‘आप’चा दारुण पराभव झाला. त्यात दिल्लीत पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ‘आप’ का क्या होगा? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरातला विरोधी पक्ष ‘व्हेंटिलेटर’वर असताना ‘आप’ने ट्विटरवरून का होईना मोदी सरकारच्या विरोधाची ‘धुगधुगी’ कायम ठेवली होती. मात्र टीकेपलीकडे कोणताही कार्यक्रम नसल्याने व पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला  केवळ मांजरासारखे आडवे जाण्याची भूमिका पार पाडल्याने आपची वाटचाल दुर्दशेच्या मार्गाने सुरू आहे की काय अशी शंका येते.

यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराविरोधात अण्णा हजारेंनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. अण्णांच्या या एका उपोषणामुळे ‘आप’चा पाळणा दिल्लीतील जंतरमंतरवर हलला. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे असा आव आणत मग केजरीवालांनी दिल्लीकरांना भुरळ घातली. प्रत्यक्षात मात्र सर्वात भ्रष्ट, गुंड, दलाल आणि वादग्रस्त मंडळींचा मुक्त वावर आपमध्येच आहे. कथनी एक आणि करणी दुसरीच या धोरणामुळे दिल्लीकरांच्या मनातून केजरीवाल कधीच उतरले. मात्र कोणतेही कर्तृत्व सिद्ध न करता कधी वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूक लढव, तर कधी पंजाब-गोव्यात हातपाय मार असा विचित्र कार्यक्रम केजरीवालांनी राबवला. पंजाबच्या पराभवानंतर केजरीवाल यांनी ‘आप’ची सगळी मते अकाली दलाला मिळाली असा जावईशोध लावला होता. ‘दैव देते अन् कर्म नेते’ ही उक्ती आपच्या बाबतीत अत्यंत चपखल बसते. एका उपोषणातून आणि लोकपालचा जयघोष करत जन्माला आलेला ‘आप’ आजच्या राजकारणातला ‘जोकपाल’ ठरत आहे.

वास्तविक काँग्रेससह अन्य राजकीय विरोधकांची अवस्था शेवटच्या घटका मोजत असल्यासारखी आहे. अशा परिस्थितीत जबाबदार राजकीय विरोधक म्हणून केजरीवाल यांच्या पक्षाला काँग्रेसची पोकळी भरता आली असती. मात्र राजकारण गांभीर्याने करण्याऐवजी निव्वळ गमतीजमतीने करण्याच्या वृत्तीने आपचे हसू झाले आहे. दिल्लीत केवळ केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडणाऱ्या केजरीवालांच्या पक्षाला पंजाबात एक जबरदस्त राजकीय संधी होती. मात्र फाजील आत्मविश्वास आणि चुकीच्या निवडी यामुळे पंजाबातील संधी त्यांनी हातची घालवली. ‘पंजाबला नशामुक्त करू’ अशा घोषणा देणाऱ्या केजरीवालांनी प्रत्यक्षात ‘चोवीस तास तर्रर’ असल्याचा आरोप असणाऱ्या खासदार भगवंतसिंग मान यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिल्यानंतर शीख बांधवांना ‘हे महाशय सत्तेवर आल्यावर काय होईल?’ याचा अंदाज आला आणि त्यांनी मोठ्या हुशारीने काँग्रेसचे कॅ. अमरिंदरसिंग या तुलनेने भल्या माणसाला सत्तेत बसवले. गोव्यातही ‘आप’चा फुगा फुटला. आता दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपची वळकटी बांधून यमुनेत विसर्जन करण्यासाठी भाजप आसुसला आहे. ‘आप’चा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दस्तुरखुद्द भाजप अध्यक्ष अमित शाह हे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये फिरत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांनी असल्या निवडणुकात प्रचार करावा की नाही, हा वादाचा मुद्दा असला तरी आपचे वळवळणारे उरलेसुरले शेपूटही ठेचायचा भाजपचा जोरदार प्रयत्न आहे. दिल्लीतील महापालिकांमध्ये आपचा पाडाव झाला तर २०१९ मध्ये या पक्षाला अस्तित्वासाठी झगडावे लागेल हे उघड आहे.

आपली प्रतिक्रिया द्या