बॉलिवूड चित्रपटात कलाकारांनी परिधान केलेल्या पोषाखांचे पुढे काय होते, वाचा सविस्तर

बॉलिवूड चित्रपटात कलाकारांनी परिधान केलेल्या पोषाखांकरिता करोडो-लाखो रुपये खर्च करण्यात येतात. माधुरी आणि ऐश्वर्याच्या ‘देवदास’ सिनेमात त्यांनी परिधान केलेली साडी, ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात रणवीर सिंहच्या पोषाखाची किंमत लाखो, कोटी रुपये होती. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर या पोषाखांचे पुढे काय केले जात असावे, याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांच्या मनात असते.

फॅशन डिझायनर अक्षय त्यागी यांनी या प्रश्नाचे उत्तर एका मुलाखतीत दिले आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री यांनी परिधान केलेले कपडे अत्यंत महागडे असतात. या कपड्यांची किंमत लाखो-करोडो रुपये असते. चित्रीकरण झाल्यावर हे कपडे पॅक केले जातात. त्यानंतर कलाकारांची एखादी नवीन कलाकृती साकारण्याकरिता या पोषाखांचा वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल, यावर प्रयोग केला जातो.

‘कजरा रे’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने परिधान केलेला ड्रेस मिक्स अँड मॅच करून ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातील एका नर्तकीने परिधान केला होता.

अक्षय त्यागी पुढे सांगतात की, चित्रपटातील कलाकाराला एखादा पोषाख आवडला किंवा चित्रपटातील व्यक्तिरेखा त्यांच्याशी मिळतीजुळती असेल तर काही वेळा कलाकार असे पोषाख स्वत:करिता ठेवून घेतात. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील नैना हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिपिका पादुकोण हिने गॉगल वापरला होता. हा गॉगल ती चित्रीकरणानंतर तिने स्वत:जवळ ठेवला.

पोशाखाचा लिलाव

चित्रपटात कलाकरांनी परिधान केलेल्या पोषाखांचा लिलावही केला जातो. ‘जीने के है चार दिन’ या गाण्यात अभिनेता सलमान खानने वापरलेले टॉवेल 1.42लाख रुपयांना लिलावात विकला गेला होता. टॉवेलच्या लिलावातून मिळालेले पैसे एका चॅरिटी ट्रस्टला देण्यात आले होते.

ऐश्वर्या आणि रजनीकांतच्या ‘रोबोट’ या सिनेमामध्ये त्यांनी परिधान केलेले कपडे अतिशय महागडे होते. या कपड्यांचा लिलाव केल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली.