मैत्री.. प्रेम… काय असतं हे सगळं…?

मैत्रीनीलेश मालवणकर

धीर एकवटून मी तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो.

‘याचं नेमकं काय चाललंय?’ असा भाव तिच्या चेहऱयावर आला.

‘माझ्याशी फ्रेन्डशिप करशील का?’ मी विचारून टाकलं. तिने आश्चर्याचा आ वासला.

साहजिकच आहे. १९९५ चं वर्ष. स्थळ नाशकातलं कॉलेज. मुलांनी मुलींशी बेधडक बोलावं इतकं खुलं वातावरण नव्हतं. अशात दुसऱया वर्गातल्या मुलीला फ्रेन्डशिपसाठी विचारून मी डेअरिंगची परिसीमाच गाठली होती. ‘फ्रेन्डशिप ही खूप वेगळी टर्म आहे. फ्रेन्डशिप करायची म्हणजे आपण नेमकं काय करायचं?’ तिने कॉन्व्हेन्टी इंग्रजीत विचारलं.

मी माय मराठीचा पाईक इंग्रजीच्या भडीमाराने गडबडलो.

व्हेग म्हणजे अस्पष्ट किंवा संदिग्ध. व्हेग आणि व्हल्गर या दोन इंग्रजी शब्दांमध्ये माझ्या इंग्रजीच्या दिव्य ज्ञानाने घोळ केला. मला वाटलं, ती म्हणतेय फ्रेन्डशिप हा व्हल्गर म्हणजे अश्लील शब्द आहे.

जगरहाटीप्रमाणे तिला आता फ्रेन्डशिपसाठी विचारून नंतर यथावकाश त्या फ्रेन्डशिपला प्रेमात अपग्रेड करायचं हा माझा प्लान होता.

‘फ्रेन्डशिपमध्ये अश्लील काही नसतं’ हे इंग्रजीत कसं म्हणायचं हे न समजल्यामुळे मी ‘व्हॉट व्हेग इनसाइड फ्रेन्डशिप?’ असं पुटपुटत माघार घेतली. कॉन्व्हेन्टी प्रकरण आपल्याला झेपणार नाही, हे जाणवून नंतर कधीच तिला तोंड दाखवलं नाही.

कॉलेजनंतर नोकरीसाठी पुण्यात आलो. फेसबुकवर कॉलेजचा ग्रुप बनला. त्यात तीसुद्धा होती. साहित्यक्षेत्रात माझं बऱयापैकी नाव होऊ लागलं होतं. मी मात्र तिच्या प्रोफाइलमध्ये जाऊन ती सध्या काय करते ते पाहायचो. तीसुद्धा पुण्यात नोकरी करते हे कळलं.

एकदा माझ्या मेसेंजरवर तिचा मेसेज आला. मी तिचं प्रोफाईल चोरून पाहतो, हे तिला कळलं की काय? मी घाबरलो.

‘तुझ्या कथा वाचल्या. छान लिहितोस.’ ती.

‘थँक्यू.’ मी सुटकेचा निश्वास टाकला.

‘कॉलेजमध्ये तुला पाहिल्याचं आठवत नाही.’

ती माझ्या फजितीबद्दल विसरली होती. मला बरं वाटलं.

‘मी कॉलेजमध्ये ऍक्टिव्ह नव्हतो.’

‘मीसुद्धा कॉलेजात ‘घासू’ होते. पण आता वाचनाची आवड लागलीय. तुझ्या लिखाणाच्या तर प्रेमात पडलेय.’

ती अशीच तारीफ करत राहिली तर माझं डोकं छताला आदळेल, अशी भीती वाटली.

‘एक विचारु?’ ती. ‘तुला लिखाणात डिस्टर्ब होणार नसेल तर तुला फेसबुकवर फ्रेन्डशिप रिक्वेस्ट पाठवली तर चालेल का?’

मला चक्कर यायची बाकी होती.

‘फ्रेन्डशिप ही खूप व्हेग टर्म आहे’, असं टाईप करण्याचा मोह मी मोठय़ा मुश्किलीने आवरला.

 

आपली प्रतिक्रिया द्या