विजयाची खात्री असेल तर पंतप्रधान रस्त्यावर का आले?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात विजयाची पक्की खात्री असेल आणि तुमच्याकडे उत्तम ‘स्टार प्रचारक’सुद्धा असतील तर मग ‘रोड शो’साठी तुम्हाला स्वतःला रस्त्यावर उतरण्याची गरजच काय अशा शब्दांत भाजप नेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज निशाणा साधला.

मोदी यांनी शनिवारी आणि रविवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात लागोपाठ दोन ‘रोड शो’ केले. वाराणसीत मतदान होणार असलेला मतदानाचा शेवटचा टप्पा हा भाजपने आणि मोदी यांनीही प्रतिष्ठेचा मानला आहे, पण मतांसाठी आणि पक्षाच्या विजयासाठी पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्याने इतके हवालदिल व्हावे काय, असा सवाल सर्व थरांतून विचारला जात आहे. हा सवाल शनिवारी राष्ट्रीय लोक समता पार्टी या भाजपच्या मित्रपक्षाचे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनीही विचारला होता. त्यापाठोपाठ आज शत्रुघन सिन्हा यांनी ट्विटरवरून मोदींच्या ‘रोड शो’वर हल्लाबोल केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रोड शो केला तो फसला. आता आणखी एक रोड शो करताहेत तोही असफल होईल. मग पुन्हा एखादा रोड शो. असे रोड शो करतच ते कुठे तरी निघून जातील”.
– अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.

“मोदी यांचा शनिवारचा रोड शो आचारसंहितेचा भंग करणारा होता. बड्या पदावरच्या नेत्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करणे हे लोकशाहीला घातक आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची गरज आहे”.
– मायावती, अध्यक्षा बसपा.

आपली प्रतिक्रिया द्या