मुळात कुलभूषण जाधव जिवंत तरी आहेत काय?- उज्ज्वल निकम

49

सामना प्रतिनिधी । पुणे

हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने पुरेपूर लपवाछपवी चालवली आहे. ते पाहता मुळात जाधव हे आता जिवंत तरी आहेत काय असा प्रश्न भेडसावू लागला आहे, असे प्रख्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे सांगितले. पाकिस्तानचा पूर्वेतिहास पाहता जाधव यांचा मृत्यू झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही असे सांगून ते म्हणाले की, जर जाधव जिवंतच नाहीत तर मग त्यांना कोणाला भेटवायचे कसे, असा प्रश्न पाकिस्तानला सतावत असावा. त्यामुळेच जाधव यांना कोणालाही भेटू दिले जाणार नाही अशी भूमिका घेत पाकिस्तानने लपवाछपवी चालवली आहे.

कुलभूषण जाधव यांचा कबुलीजबाब बळजबरीने घेतला असण्याची शक्यता आहे. ज्याअर्थी त्यांना कोणालाही भेटू देण्यास परवानगी दिली जात नाही याचे दोन अनुमान निघतात असे निकम यांनी सांगितले. एक म्हणजे जाधव यांचा तथाकथित जबाब हा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी क्रूरतेने हाल करून घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर कोणी जाधव यांना भेटले तर ही बाब उघड होण्याचा धोका पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार आरोपीचा कबुलीजबाब जबरदस्तीने घेतला असेल तर तो ग्राह्य मानला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून लपवाछपवी केली जात आहे असे ते म्हणाले.

कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध खटला पाकिस्तान सरकारने खुल्या न्यायालयात चालवावा. जागतिक मानवी हक्क संघटना आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघाच्या प्रतिनिधींसमोर हा खटला चालविल्यास जाधव यांना न्याय मिळेल.

देशाने ‘ट्रम्प’कार्ड टाकावे!
पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणी हिंदुस्थानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आपली बाजू मांडावी. हा ट्रम्पकार्ड टाकल्यास पाकिस्तानची खेळी त्यांच्यावर उलटविता येईल. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत तयार करून पाकिस्तानवर दडपण आणावे लागेल असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

जाधवांची पाकड्यांनी केली हत्या, भाजप खासदाराने व्यक्त केला संशय

आपली प्रतिक्रिया द्या