अभिनेता शेखर फडकेला काय खायला आवडतं? वाचा सविस्तर

47

गरजेपुरेते जेवणे ही जरी अभिनेता शेखर फडकेची खाण्याविषयी व्याख्या असली तरी अंडं त्याच्या विशेष प्रेमातलं आहे.

अंडं भात
सर्वप्रथम भात नेहमीप्रमाणे शिजवून घ्यायचा. कढईत फोडणीसाठी ऑलिव्ह ऑइल गरम करून घ्यायचा. फोडणीसाठी या तेलात हिंग, जिरे, कढीपत्ता, हळद, तिखट घालायचं थोडं परतवल्यावर यामध्ये अंड फोडून टाकायचं पुन्हा परतवून घ्यायचं. नंतर त्यावर शिजलेला भात घालून व्यवस्थित परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं. वाफ येण्याकरिता काही सेकंद झाकण ठेवायचं. गरमागरम सर्व्ह करायचं.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ?

– पाणी जसं जीवन आहे त्याप्रमाणे अन्नही महत्त्वाचा घटक आहे. अन्न हे परब्रह्म आहे.

खायला काय आवडतं ?

– आईच्या हातचे सगळे शाकाहारी पदार्थ आवडतात. घराबाहेर असलो तर मांसाहारी पदार्थ खायला जास्त आवडतात. वेळ आणि भूकेनुसार खातो.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ?

– मी फिटनेसच्या बाबतीत फारसा जागरुक नाही. वयानुसार खाण्यात बदल करणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. माझ्या खाण्याच्या सवयीही तशाच बदलत गेल्या. त्यामुळे गरजेइतपत अन्न खातो. पाणी खूप पितो.

डाएट करता का ?

– नाही. फक्त आजारपणात पथ्यपाणी सांभाळतो शिवाय कामानुसार डाएट अपेक्षित असेल तरच करतो. नाचणी, बाजरी, ज्वारीच्या पदार्थांचा आहारात समावेश असतो.

आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता ?

– प्रमाण सांगता येणार नाही, पण बाहेर खायला आवडतं. पूर्वी मला जंक फूड खायला खूप आवडायचं. सध्या ही आवड कमी झाली. पाणीपुरी मला आईने केलेलीच आवडते.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता ?

– कुठल्याही एसी हॉटेलमध्ये जायला आवडतं. अंड मला प्रचंड आवडतं. त्याचे वेगवेगळे प्रकार बोरिवलीला चांगले मिळतात. जिथे ते चांगले मिळतात ते मी आवर्जून खातो.

कोणतं पेय आवडतं ?

– घरगुती ताक आणि लिंबू सरबत

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता ?

– ज्या हॉटेलमध्ये अंड मिळतं तिथे मी जातो. प्रत्येक ठिकाणच्या वैशिष्टय़पूर्ण पदार्थांची चव आवर्जून चाखतो. गोव्याला गेल्यावर पहिल्यांदा मासे खाल्ले तेव्हापासून मला मासे आवडू लागले. प्रयोगाच्या अगोदर दोन तास खातो.

स्ट्रिट फुड आवडतं का ?

– हो, बाहेरचे वडापाव, अंडपाव खायला मला आवडतात.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ?

– आईने केलेले कोणतेही पदार्थ मला आवडतात.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ?

– माझ्या आईने केलेली तुरीच्या डाळीची दाल-खिचडी, दहीवडे, ताक आवडते.

उपवास करता का ?

– मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात उपवास करावे लागत नाही, तर घडतात असं माझं मत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या