गुढीपाडव्याच्या दिवशी या गोष्टी न विसरता करा!

2404

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

काल निवांत वेळ मिळालेला. खिडकीत बसून मस्त वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत होते आणि समोर असलेल्या झाडांकडे सहज लक्ष गेले. जुनी पाने गळून नवीन पालवी फुटत होती. दरवर्षी हाच क्रम. जुनी गळकी पाने पडून नवीन टवटवीत हिरवी पालवी झाडाला फुटते. ह्यात नवीन असे काहीच नाही. हा तर निसर्गाचा नियमच आहे. फाल्गुन संपून चैत्र सुरू होईल. चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. इथे झाडांना नवीन पालवी फुटतेय. तिथे झेंडूच्या फुलांनी संपूर्ण जमीन सुवर्णाचीच असल्याचा भास होतोय. चैत्र महिन्यात इतर फुले दुर्मिळ असतांना ह्या सोन्याच्या फुलांना बहर आलेला असतो. आंब्याची झाडे गडद हिरव्या कैऱ्यांनी लगडलीयेत. संपूर्ण वसुंधराच जणू हिरवा शालू नेसून आणि सोन्याचे दागिने मिरवत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतुर दिसते. खरया अर्थाने नवीन वर्षाचा प्रारंभ वाटतो.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणांना वेगळेच महत्त्व आहे. ह्या ऋतूत थंडीचा सोस कमी होऊन उन्हाचा मारा सुरू होतो. म्हणूनच होळी आणि रंगपंचमी सारखे सण आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यानंतर येते चैत्र प्रतिपदा. २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर येतो. ह्याच दिवशी भर दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्याला वसंतसंपात म्हणतात. सूर्य बरोबर डोक्यावर म्हणजे पृथ्वीवरच्या तापमानात वाढ. तापमानात वाढ म्हणजे शरीरातून साखर आणि पाणी कमी होणे (glucose), अंगावर पुरळ उठणे. आपल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीत कलशाबरोबरच आपण साखरेच्या गाठी आणि कडूलिंबाची पाने जरीच्या वस्त्राला माळतो. साखरेच्या गाठी शरीरातील glucose कमी होण्यावरचा आणि कडुलिंब ह्या दिवसांत होणाऱ्या पित्तावरचा उपायच नाही का? १ जानेवारीपेक्षा चैत्र प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षासाठी योग्य ठरतो.

यंदा गुढीपाडवा १८ मार्चला आहे. गुढीपाडवा हे मराठी नववर्ष तर आहेच पण हिंदू नववर्षही आहे. ह्या नवीन वर्षी काय करावे की ज्यामुळे आरोग्य आणि सांपत्तिक स्थिती उत्तम राहील ह्यांसाठी आजचा लेख.

गुढीपाडव्याला काय करावे?

१) शक्यतो गुढीपाडव्याआधी वास्तुमध्ये साफसफाई करून घ्यावी. कानाकोपऱ्यातून दिसणारी जळमटे, धूळ तरी नक्की साफ करावी. वास्तुबाबरोबरच दाराबाहेरीलही सफाई करून घ्यावी. ह्यामुळे कुंडलीतील शनिची स्थिती सुधारते.

२) गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण वास्तुतील फरशी पुसून घ्यावी. दाराबाहेर रांगोळी घालावी.

३) सुगंधीत अत्तर पाण्यात घालून वास्तूत शिंपडून घ्यावे. रांगोळी आणि अत्तर ह्यामुळे कुंडलीतील शुक्र सुधारतोच आणि लक्ष्मीचीही कृपा होते.

४) गुढीपाडव्यापासून आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालावीत. ह्यांमुळे त्वचेला उन्हाचा होणार त्रास टाळता येईल. कडुनिंबाची पाने,धण्याचे अख्खे दाणे आणि गुळ हे मिश्रण चघळून खाणे. ह्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट थंडही रहाते. ह्यांमुळे ज्यांचा बुध खराब आहे त्यांचा कुंडलीतील बुध सुधारतोच,पचनक्रियाही सुरळीत होते.

५) ह्या दिवसापासून चैत्र नवरात्री सुरू होते. ह्या नवरात्रीत दुर्गासप्तशतीचा पाठ घरी करून घ्यावा अथवा online सप्तशतीचा पाठ रोज ऐकावा. ह्या नवरात्रीत एखाद्या होतकरू आणि गरीब मुलीला किंवा मुलींना (तुमच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे ) शिक्षणासाठी वह्या-पुस्तके इ. वस्तू नक्की देणे.

६) गुढीपाडव्याला वडाच्या झाडाची मुळी आणून ती हरड्याबरोबर एका लाल कापडात ठेवून त्याची पूजा केली जाते. आणि ही पुडी दाराच्या चौकटीला टांगली जाते. ह्यामुळे आरोग्य आणि सांपत्तिक स्थिती व्यवस्थित राहण्यास मदत होते.

७) गुढीपाडव्यापासून नऊ दिवस पुढे – || ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ || हा मंत्र रोज म्हणावा. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण ह्यासाठी म्हणावा.

८) ह्या दिवसापासून उन्हाळा वाढत जातो. जमल्यास एक संकल्प नक्की करा. ह्या दिवसांत प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि त्याचबरोबरीने तहानलेले गरीब जीवही असतात. आर्थिक ऐपतीप्रमाणे गरजू व्यक्तिंना पाण्याच्या बॉटल्स देऊ शकाल. ह्यामुळे कुंडलीत चंद्राची स्थिती सुधारण्यास होण्यास मदत होते. हा उपाय नक्की करून पहावा.

९) तुमच्या घराच्या आवारात किंवा चौकात जागा असल्यास प्राण्यांसाठी पाण्याची सोय करा. तेही शक्य नसल्यास पक्ष्यांसाठी पाण्याची वाटी खिडकीबाहेर ठेवू शकाल. ह्यामुळे आत्मिक समाधानही लाभते आणि कुंडलीतील दोषांचे निवारण होण्यास मदत होईल.

वरील उपाय नक्की करून पहा. आणि हो आपले नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच. हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हांला भरभराटीचे, सांपत्तिक उत्कर्षाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या