कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय कराल ? वाचा सविस्तर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे बरेच डॉक्टर किंवा सल्लागार सांगत आहेत. अजून दुसरी लाट संपत नाही, तोवर तिसऱ्या लाटेबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याकरिता तसेच जे रुग्ण कोरोनाच्या आजारपणातून बरे झाले आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी सांगत आहेत डॉ. निर्मल गुप्ता.

लिव्हर, किडनी, मानसिक आजार, ह्रदयविकार असे आजार असणाऱ्या व्यक्तिंच्या आरोग्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांना सतत नैराश्य येते, भीती वाटते असे त्रास असणाऱ्या मनोरुग्णांना तसेच ज्यांना कार्यालयात तणावग्रस्त स्थितीत काम करावे लागते, अशांना तरुणांनाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काळजी घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयार राहायला हवे. याकरिता दिनचर्येचे आणि ऋतुचर्येचे पालन करणे आवश्यक आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालणे, किमान अर्धा तास ध्यानधारणा, योगासने, शरीर ताणले जाईल असे (स्ट्रेचिंग) व्यायाम प्रकार करावेत.

जे कोरोनातून बरे झाले आहेत, अशा रुग्णांनी सुरुवातीला दोन आठवड्यांनी नंतर चार आठवड्यांनी त्यानंतर तीन-तीन महिन्यांनी कोरोना तपासणी करून घ्यावी. तपासणीत सुधारणा जाणवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आहारात साखरेचे पदार्थ कमी खा, शरीरावर अतिरिक्त मेद (चरबी) वाढू देऊ नका. रात्रीचे जेवण खूप उशिरा घेणे टाळा. शक्यतो सायंकाळी सातपर्यंत रात्रीचे जेवण करा. यामुळे आजार लवकर दूर व्हायला मदत होईल.

ह्रदयविकार, किडनी फेल होणे असे आजार असलेले रुग्ण, ज्यांना कोरोना होऊन गेला आहे आणि ज्यांचे वय 40 पेक्षा जास्त असेल त्यांनी स्वत:कडे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषध कायम ठेवावीत. गरज लागल्यास ती घेता येतील.

जे निरोगी आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचे आजार नाहीत त्यांनी औषधांविना निरोगी जीवन कसे जगता येईल, याकरिताही डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार आहार-विहार, व्यायाम, जीवनशैली ठेवावी. कारण उगाचच घेतलेल्या औषधांमुळेही शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या