जजसाहेब आज कोर्टात आहेत. उद्या ते राजकारणात दिसल्यास सामान्य माणसाला काय वाटेल? न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर काही काळ थांबावे. राजकारणात गेलात तरी पुरेसा वेळ द्यायला हवा. कारण एक कुलिंग ऑफ पीरियड तर हवाच ना… अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परखड मते मांडली. त्यांचे हे मत म्हणजे कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन भाजपात गेलेले गंगोपाध्याय, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती हिदायतुल्ला, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा यांच्यासह राजकारणात उतरलेल्या डझनभर न्यायमूर्तींसाठी सणसणीत टोला मानला जात आहे.
उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतर राजकीय पद स्वीकारणे योग्य आहे का? असा सवाल सरन्यायाधीशांना विचारण्यात आला. यावर मला वाटते की, तुम्ही न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर काही काळ थांबावे. राजकारणात गेलात तरी पुरेसा वेळ द्यायला हवा. राजकारणात यावे की नाही हा वेगळा विषय आहे. हा वादाचा मुद्दा आहे. पण राजकारणात प्रवेश करायचा असेल तर कूलिंग ऑफ पीरियड गरजेचा आहे, असे ते म्हणाले. मला इतर कोणाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करायचे नाही. पण आपण म्हणतो, न्याय झालाच पाहिजे असे नाही, तर होतानाही दिसला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.