२०१७च्या अर्थसंकल्पात नवीन काय होतं?

2031

विरोधकांची टीका

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प रद्द करण्याच्या निर्णयावरही विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.

शायरीचा अर्थसंकल्प  हा फक्त शेरोशायरीचा अर्थसंकल्प होता. आम्ही मोठा धूमधडाक्याची अपेक्षा केली होती, मात्र शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी त्यात काहीही नाही. पंतप्रधानांनी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या अर्थसंकल्पात त्याबद्दल काहीच नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत तरीही सरकारला त्यांचे कर्ज माफ करण्याची गरज वाटत नाही हे लज्जास्पद आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.

निराशाजनक
हा अर्थसंकल्प निराशाजनक असून बिहारसारख्या राज्यासाठी फायद्याचे त्यात काही नाही. सवा लाख कोटींच्या पॅकेजचा त्यात उल्लेख नसून देशाला जोडणाऱ्यां रेल्वेचाही सत्यानाश करून टाकण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांबाबत अर्थसंकल्पात पाऊल उचलण्यात आलेले नाही. तसेच ‘पीमजीएसवाय’ सहित अनेक योजनांतील आपला वाटा केंद्र सरकारने कमी केला आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले.
राष्ट्रपतीचे भाषण सुरू असताना खासदार ई. अहमद यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अहमद यांचे निधन झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करायला हवे होते. मात्र केंद्राने असंवेदनशीलता दाखवत अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी हे हिंदुस्थानचे ट्रम्पच आहेत, अशी बोचरी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली.

आशा आणि निराशा

सकलजनांचा विचार – मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्यां अर्थाने सर्वसमावेशक विकासाचा मजबूत, खंबीर आणि धाडसी संकल्प आहे. तो नवभारताच्या निर्मितीसोबतच सकलजनांचा विचार करणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

‘रईस’ केंद्रस्थानी – राधाकृष्ण विखे-पाटील

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात ‘रईस’ केंद्रस्थानी असून त्यामध्ये सर्वसामान्यांना कुठेही प्राधान्य नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शेतकरी व गरीबांचा सन्मान – अर्थमंत्री मुनगंटीवार

शेतकरी आणि गरीबांच्या कल्याणाची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांची निराशा – धनंजय मुंडे

अर्थसंकल्प हा केवळ आकडय़ाची हेराफेरी व वस्तुस्थितीशी फारकत घेणारा आहे. उद्योजकांना सवलती देताना शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीसारखा निर्णय न घेऊन वाऱ्यावर सोडल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

घोषणांचा पाऊस – जयंत पाटील

अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.

फक्त घोषणा – अशोक चव्हाण
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस योजना नाहीत. केवळ घोषणांचा वर्षाव आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांना निराश करणारा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या