व्हॉट्सअॅपचे भन्नाट फिचर्स, डिलीट केलेले पुन्हा डाऊनलोड होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करण्यासाठी जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया माध्यम म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिले जाते. व्हॉट्सअॅप नवनवीन कल्पना लढवून वेगवेगळे फिचर्स आणते आणि युझर्सला आपल्याकडे आकर्षित करत असते. आता देखिल व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फिचर्स आणले आहे. या फिचर्सची बातमी वाचूनच तुम्हाला आनंद होणार आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने आणलेल्या नव्या फिचर्समुळे डिलीट केलेले फोटो, व्हिडीओ, जीआयएफ पुन्हा एकदा डाऊनलोड करता येणार आहेत. या नव्या फिचर्समुळे एखादा महत्त्वाचा व्हिडीओ किंवा फोटो चुकून डिलीट झाल्यास युझर्सला चांगलाच फायदा होणार आहे.

यापूर्वी व्हॉट्सअॅपमधून शेअर केलेले फोटो, जीआयएफ, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप ३० दिवसांपर्यंत स्टोअर करून ठेवता येत होते, परंतु काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपने ही सुविधाही बंद केली होती, आता पुन्हा ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु आता फक्त डिलीट केलेल्या मीडिया फाईल्स डाऊनलोड करता येणार आहेत. याचा वापर करून दोन महिन्यापूर्वी डिलीट केलेल्या फाईल्सही डाऊनलोड करता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या अॅड्रॉईड व्हर्जन २.१८.११३ यावर हे फिचर्स अपडेट करण्यात आले आहे. तर आयओएस (iOS) युझर्सला यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.