व्हॉटस् ऍपच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह

<< वेब न्यूज >>

तोबियस नावाच्या सायबर सुरक्षा तज्ञाने व्हॉटस् ऍप सुरक्षित नसल्याचा आणि त्यातील संदेश बॅकडोरने कोणीही वाचू शकत असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. तोबियसच्या म्हणण्यानुसार आपले संदेश हे इनक्रिप्टेड असल्याचा आणि कोणीही थर्डपार्टी ते वाचू शकत नसल्याचा कितीही दावा व्हॉटस् ऍप करत असले, तरी हे संदेश सुरक्षित नाहीत. व्हॉटस् ऍपमधील बॅकडोर यंत्रणेत असलेल्या त्रुटीचा फायदा घेऊन हे संदेश वाचणे शक्य आहे. अर्थात तोबियसच्या या दाव्याला खोडून काढण्यासाठीदेखील काही तज्ञ पुढे सरसावलेले असून त्यांच्या दाव्यानुसार व्हॉटस् ऍपमध्ये अशी कुठलीही त्रुटी नसून तो यंत्रणेच्या सुरक्षेचाच एक भाग आहे. एका बाजूला हे सगळे वादविवाद सुरू असतानाच हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरती सुनावणी करताना ‘व्हॉटस् ऍपवरील डाटा, संदेश हे कितपत सुरक्षित असतात?’ अशी विचारणा केंद्र सरकार, ट्राय, व्हॉटस् ऍप आणि फेसबुकला केली आहे. ‘व्हॉटस् ऍपवरील डाटा असुरक्षित असल्याने त्याचा वापर करताना घटनेच्या २१ व्या कलमाचे उल्लंघन होतं’ असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

अल्कोहोल सेंसर बँड – लासवेगासमध्ये सुरू असलेल्या एका ग्राहक मेळाव्यात ’प्रूफ’ कंपनीतर्फे एक अनोखा रिस्ट बंड सादर करण्यात आला आहे. हा रिस्ट बॅँड आपल्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण मोजून आपल्या शरीरात किती प्रमाणात अल्कोहोल गेलेले आहे त्याची आकडेवारी देतो. याचबरोबर आपल्या साथीदारांच्या अल्कोहोल प्रमाणाची माहितीदेखील याद्वारे मिळवता येते. हा बंड थेट शरीरातूनच आकडेवारी मिळवत असल्याने याच्या उपयोगासाठी मोबाईल किंवा इतर ऍपची गरज पडत नाही. या रिस्ट बॅँडच्या निर्मितीसाठी सध्या क्राउैड फंडिंगची योजना आखली जात आहे. सर्वच चाचण्यांत जर हा रिस्ट बॅँड योग्य ठरला तर बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रेथऍनेलायझरच्या तोडीसतोड काम करणारा म्हणून याच्या वापरास सुरुवात करण्यास हरकत नसेल. यात बसवलेला सेन्सर फिटनेस ट्रकप्रमाणेच कार्यरत राहणार आहे.