रोखठोक : आता जीना विरुद्ध सावरकर

418

rokhthokअलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बॅ. मोहम्मद अली जीना यांची तसबीर हटविण्यात आली. त्यामुळे वीर सावरकरांच्या तसबिरी हटवा अशी मागणी सुरू आहे. हे मोदींच्या राज्यात सुरू आहे. अर्थात, अशी मागणी होते हाच खरं तर सावरकरांचा बहुमान आहे. प्रश्न इतकाच आहे की, वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी देणार?

हिंदुत्वाच्या नावाखाली विष पेरण्याचे काम सध्या सर्वच पातळीवर सुरू आहे. काँग्रेस राजवटीत बेगडी निधर्मीवादाचा अतिरेक झाला तसे आता बेगडी हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत होऊ नये. हिंदू आणि मुसलमानांना समोरासमोर लढण्यासाठी उभे करायचे व त्या रक्ताच्या नद्यांत हात धुऊन घ्यायचे व २०१९ च्या निवडणुका जिंकायच्या असे कारस्थान पडद्यामागे शिजत आहे काय? अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बॅ. मोहम्मद अली जीनांचा फोटो काढण्याची मागणी झाली व तो फोटो आता उतरवला गेला. जीनांविषयी कुणाला कळवळा असण्याचे कारण नाही. लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानात गेले. तेथे जीनांच्या कबरीवर जाऊन त्यांनी चादर चढवली. जीना हे इतिहासपुरुष असल्याची मुक्ताफळे त्यांनी उधळताच हिंदुस्थानात त्यांच्याच पक्षात वादळ उठले. मुसलमानांसाठी धर्माच्या नावावर पाकिस्तान मागणारे व रक्तपात घडवून ते मिळवणारे जीना अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भिंतीवर लटकत होते. जीना हे त्या विद्यापीठाचे विद्यार्थी होते. जीनांचा फोटो उतरवला म्हणून मुस्लिम संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तसबीरही उतरवा अशी मागणी करावी हे दुर्दैवच आहे. काही घडले तरी पहिला आघात हा सावरकरांवर होतो. जिवंतपणी त्यांनी यातना भोगल्या व मृत्यूनंतरही त्यांनाच ‘लक्ष्य’ केले जात आहे. याचा अर्थ असा की, बॅ. जीना हे जितके कडवट इस्लामवादी होते तितकेच कडवट सावरकर हे हिंदुराष्ट्राच्या बाबतीत होते. आजही सावरकरद्वेष अनेकांच्या नसांतून उसळतो. ज्यांना जीना हवेत त्यांना सावरकर नकोत हाच सावरकरांचा विजय आहे.

गुन्हा काय?
सावरकरांची तसबीर अलिगढ विद्यापीठातून हटवा अशी मागणी करताच हिंदुत्ववादी गप्प का बसले आहेत? नरेंद्र मोदींवर राजकीय टीका होताच पेटून उठणारे त्यांचे भक्त सावरकरांच्या बाबतीत गप्प का आहेत? गोवंश हत्येसाठी ज्यांनी मुसलमानांना घेरून मारले त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करावा हे आश्चर्यच आहे. अलिगढ विद्यापीठातून सावरकरांची तसबीर हटवा अशी मागणी होताच वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा मोदी यांनी करायला हवी होती. मोदींच्या राजवटीत अनेकांवरील भयंकर गुन्हे काढून घेतले. उत्तर प्रदेशातील एका स्वामीवरील बलात्काराचा गुन्हाही काढून घेतला. भ्रष्टाचार आणि हत्या, खुनांच्या आरोपांतून अनेकांची मुक्तता झाली. पण वीर सावरकर आजही आरोपीच्या पिंजऱयातच उभे आहेत व त्याच त्याच आरोपांमुळे त्यांना ‘भारतरत्न’चा सन्मान मिळू शकला नाही. महात्मा गांधींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही व सावरकरांना भारतरत्न दिले गेले नाही, हे काही बरे झाले नाही.

वकील कोण?
गांधी-नेहरूंची वकिली करणारे खूप आहेत. पण सावरकरांना वकील नाही. मृत्यूनंतरही त्यांची वकिली त्यांनाच करावी लागते. आता बॅ. जीनांची तसबीर काढताच सावरकरांवर आफत आली. जीना यांची सावरकरांबरोबर तुलना करणे योग्य नाही. हिंदुराष्ट्र संकल्पना व देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी स्वतः यातना भोगल्या. ते काळय़ा पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला गेले व जिवंतपणीच अजरामर झाले. याउलट जीना यांचे आहे. ‘एका टाइपरायटरच्या जोरावर मी पाकिस्तान मिळवला’ असे जीना अभिमानाने सांगत. पाकिस्तानसाठी त्यांनी रक्ताच्या नद्या वाहिल्या. हिंदुराष्ट्रासाठीही हिंदूंनी शस्त्र घ्यावे असे सावरकर सांगत होते. तसे घडले नाही. जीनांनी ‘टाइपरायटर’च्या जोरावर पाकिस्तान मिळविण्याच्या मोहिमेस सुरुवात केली तेव्हा सावरकर येथील लेखक-विचारवंतांना ‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’ असे आवाहन करीत होते. जीनांना त्यांचे राष्ट्र मिळाले. सावरकरांना काय मिळाले? हा प्रश्नच आहे. जीनांची तसबीर पाकिस्तानच्या भिंतीवरून कोणी हटवणार नाही, पण हिंदुस्थानात सावरकरांची स्मारके व तसबिरी हटवल्या जातात. त्रिपुरात ज्यांनी ‘परका’ म्हणून लेनिनचा पुतळा तोडला त्यांनी लेनिनच्या जागी सावरकरांचा पुतळा उभारायला हवा होता. तसे का झाले नाही?

सर्वोच्च त्याग
सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वोच्च त्याग केला, पण स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारकडून कवडीचाही लाभ घेतला नाही. आता तर फुटकळ कवी व लेखकांना ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. पण सावरकरांचे गद्य व पद्य लेखन हे निदान पद्मभूषण मिळण्याच्या लायकीचे नक्कीच होते. श्रीदेवीला मरणोत्तर राजकीय सन्मान दिला जातो व विनोद खन्नालाही मृत्यूनंतर ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळतो. सर्वच राज्यकर्त्यांनी सावरकरांवर ठरवून अन्याय केला. पण हिंदुत्ववाद्यांवरील अन्याय दूर करणाऱयांचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात आहे. नव्या राजवटीत दीनदयाळ उपाध्याय यांना राष्ट्रपुरुषांचा सन्मान दिल्याने त्यांच्या तसबिरी सरकारी भिंतीवर लागल्या. पण सावरकरांच्या तसबिरींना कोठेच जागा नाही. हे सरकार शुद्ध हिंदू रक्ताचे असेल तर त्यांनी वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देत असल्याची घोषणा लगेच करावी, नाहीतर आमचे हिंदुत्व राजकारणापुरते असल्याचे जाहीर करावे!

मुळात प्रश्न असा आहे की, एखादी मोठी निवडणूक आली की पाकिस्तान, जीना आणि वीर सावरकरांसारखे विषय अचानक कसे उपटतात? हे गूढ म्हणावे लागेल. मणिशंकर अय्यरसारखे जिव्हा झडलेले लोक जणू त्यासाठीच पाळून ठेवले आहेत. या प्रवृत्तीचा धिक्कार व्हायला हवा.

ते धर्मांध नव्हते!
सावरकरांशी जीनांची तुलना जे करतात ते मूर्ख आहेत. जीना कायदेआजम, बॅरिस्टर जे काही असायचे ते असतील. वीर सावरकर हेसुद्धा तितकेच तोलामोलाचे बॅरिस्टर होते. जीना यांनी त्यांची बॅरिस्टरी पाकिस्तान निर्मितीसाठी पणास लावली तर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बॅरिस्टरी कुर्बान केली हा फरक लक्षात घ्या. सावरकर हे शिकून किंवा शिकवून तयार होत नाहीत ते जन्मावे लागतात. ते स्वयंभू असतात. सावरकर हे नेहमी प्रवाहाविरुद्ध पोहले. यशाबरोबर त्यांना चालता आले नाही. चालण्याची त्यांची इच्छा नव्हती. हिंदुत्वावर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांनी ढोंग केले नाही. ते हिंदुत्ववादी होते, पण धर्मांध नव्हते. गोरक्षणाची भाबडी चळवळ त्यांनी मूर्खपणाची ठरवली. मांसाहाराचे समर्थन केले. चातुर्वर्ण्यावर प्रखर हल्ला चढवला. सावरकर कुणाला पटोत वा न पटोत, पण आजही जीनांच्या विरोधात सावरकरांचेच नाव घेतले जाते. मणिशंकर अय्यरसारखे लोक सावरकरांच्या पुण्याईचेच खात आहेत व त्यांच्या नावावर जगत आहेत.

जीनांची तसबीर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून हटवली म्हणून सावरकरांची हटवा या मागणीतच सावरकरांचा जय आहे, पण सावरकर भारतरत्न कधी होणार?

– @rautsanjay61
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या