बावनकुळेंकडे जुगारासाठी कोट्यवधी रुपये आले कुठून? चौकशी करा; काँग्रेसची मागणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाओ येथील कॅसिनोमध्ये जुगार खेळतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच बावनकुळे यांनी जुगारामध्ये साडे तीन कोटी रुपये उडवल्याचा दावाही करण्यात येत आहे. हे सर्व दावे भाजपने फेटाळले आहेत. मात्र, आता यावरून भाजप चांगलीच अडचणीत आल्याचे दिलत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जुगारात उडवण्यासाठी कोट्यवधी रुपये आले, कुठून याची चौकशी करा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले फोटो खरे आहेत का? बावनकुळे जुगार खेळत होते का? जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाबाबत नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजप हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात मात्र पराभव झाला. भारतीय संघ जिंकला असता तर त्याचे श्रेय मात्र मोदी व भाजपाने घेतले असते. पण मोदी जेथे जातात तेथे पराभव होतो, त्यांना नशीब व प्रभू रामही साथ देत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.