‘जय’चे काय झाले, ‘जय’ गेला कुठे?

सामना प्रतिनिधी । नागपूर

आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ वाघ बेपत्ता होऊन १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. ‘जय’चे काय झाले याविषयी कोणीही सांगू शकत नाही. जय गेला कुठे, याचे उत्तर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दयावे अशी मागणी वन्यप्रेमी करीत आहे. जयचा मुलगा जयचंदचे लोकेशन वनविभागाला मिळाले नाही, या दोघांची शिकार झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे, एकीकडे वाघ वाचविण्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे वन्य प्राण्यांचे प्राण जात आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने जयचे काय झाले हे जाहीर करावे, अशी मागणी जोर धरत आहे. सरकार नागपूर जवळ टायगर टुरिझम पार्क तयार करीत आहे. पण लाख मोलाच्या वाघांची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘जय’चे बेपत्ता होण्यामागील रहस्य अद्यापही कायम आहे. त्यातच माजी खासदार नाना पटोले यांनी तर वनमंत्र्यांसह वनविभागाचा या वाघाच्या बेपत्ता होण्यामागे हात असल्याचा जाहीर आरोप केला होता.
जय गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील खापरी डोंगर महादेव पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो अडीच ते तीन वर्षाचा होता. या जंगलाचा समावेश नंतर उमरेड पवनी करांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात करण्यात आला. काही दिवसातच ‘जय’ वाघ या अभयारण्याचा हिरो ठरला. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवस पर्यंत ऑनलाईन बुकींग चालत होती. शेकडो पर्यटकांना प्रतिक्षा यादीवर राहावे लागत होते. अनेक सेलीब्रीटींनीही ‘जय’ला पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाई, पाच फुट लांबी आदी गुणांनी जय हा पर्यटकांना येथे येण्यास भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जयने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वन विभागाच्या जंगलावर आपले साम्राज्य निर्माण केले होते. अनेक मोठ्या वाघांना ‘जय’ने पळवून लावले होते. येथे ‘जय’चा एवढा दरारा होता की इतर कोणताही वाघ जयच्या धाकाने भटकत नव्हता.

जयच्या विविध गुणांमुळे तो हिंदुस्थानातील एक महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ हा साधारणत: १०० चौरस किलोमीटर परीसरात फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमीटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किलोमीटर अशा २५० किलोमीटरच्या जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर उमरेड भिवापूर कऱ्हांडला जंगलात आठ दिवस राहात होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरली असतानाही जय नदी पोहून पलीकडे जात होता. असा हा जय गेला कुठे, याचे उत्तर वन विभागाने दयावे, अशी मागणी व्याघ्रप्रेमी करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या