फिरकीपटूंवर हा अन्याय…; गौतम गंभीरने ICC च्या ‘या’ नियमावर ठेवले बोट

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा त्याच्या भेदडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकतेच ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या ‘राईज टू लीडरशीप’ या ‘टॉक शो’मध्ये गौतम गंभीरने ICC च्या एका नियमावरून आपले मत मांडले आहे. तसेच आयसीसीला या नियमाचा पुन्हा एकदा विचार करावा असा सल्ला दिला आहे.

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने दोन चेंडूंचा वापर केला जातो. यावरुन गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली. “मला एक गोष्ट नक्कीच बदलायला आवडेल ती म्हणजे व्हाईट-बॉल फॉरमेटमध्ये दोन नवीन चेंडूंचा वापर”, असे परखड मत गंभीरने यावेळी व्यक्त केले. जानकारांच्या मते दोन नवीन चेंडूंचा वापर केल्यामुळे फिरकी गोलंदाजांचे नुकसान होते. तसेच, वेगवान गोलदाजांना रिव्हर्स स्विंग करताना अडचन निर्माण होते. याच मुद्द्याला धरुन गंभीर पुढे म्हणाला की, “फिरकी गोलंदाजांसाठी हा अतिशय अन्यायकारक नियम आहे, त्यामुळेच ते आता मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळू शकत नाहीत. त्यामुळे हे बरोबर नाही”, अस मत गौतम गंभीरने व्यक्त केले.

गंभीर पुढे म्हणाला की, “दोन चेंडूंमुळे रिव्हर्स स्विंग करणाऱ्या वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंचे नुकसान होत आहे. त्यामुळेच या नियमात मला बदल करायचा आहे. मला आशा आहे की लवकरच या नियमात बदल होईल, कारण आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन बनवण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज असो, फिरकीपटू असो किंवा फलंदाज असो प्रत्येकाला त्यांची प्रतिभा दाखवण्याची समान संधी मिळत आहे का नाही हे सुनिश्चित करणे आयसीसीचे काम आहे”, अस मत गौतम गंभीरने यावेळी बोलताना व्यक्त केले.